तेव्हापासून गुप्त ठेवला जातो अर्थसंकल्प


येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री अरूण जेटली २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या बजेटमध्ये कोणासाठी काय याची उत्सुकता आहेच. अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत तो अतिशय गुप्त ठेवला जातो याचे कारण १९४७ सालात दडले आहे याची माहिती अनेकांना नाही.

असे सांगितले जाते ब्रिटनच्या लेबर चान्सलरनी १९४७ साली केलेली एक चूक अर्थसंकल्प गुप्त ठेवण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. त्यावेळी ब्रिटनच्या संसदेत लेबर चान्सलर एडवर्ड डोल्टन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी केली होती मात्र अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी एक पत्रकार त्यांना भेटायला आला तेव्हा त्यांनी अर्थसंकल्पातील कर प्रस्तावांची माहिती नकळत त्याला दिली. सायंकाळच्या वर्तमानपत्रात त्या संदर्भातल्या बातम्या आल्यानंतर एडवर्डना त्यांची चूक समजली व त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून ब्रिटनमध्ये अर्थसंकल्प गुप्त ठेवण्याची प्रथा सुरू झाली व भारतानेही हीच प्रथा स्वीकारली..

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के षण्मुखम यांनी २६ नोव्हेंबर १९४७ ला सादर केला होता. १९५५-५६ सालापर्यंत अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर केला जात असे मात्र बहुसंख्य जनतेला तो समजत नाही असे लक्षात आल्यानंतर तो हिंदीत सादर केला जाऊ लागला. स्वातंत्र्यानंतर ९ वर्षांनंतर अर्थसंकल्प सायंकाळी ५ वा. सादर करण्याची प्रथा पडली होती ती माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोडली व तेव्हापासून म्हणजे २००१ पासून अर्थसंकल्प सकाळी ११ वा.सादर केला जातो.

Leave a Comment