ढेकणांनी उडविली अमेरिकेची झोप


जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका शस्त्रे, अस्त्रे, संपत्ती, दरारा, जरब यांनी कितीही समृद्ध असली आणि रोज नवीन घोषणा करून जगातील अनेकांची झोप अमेरिकन उडवत असले तरी एका छोट्याश्या किटकाने मात्र अमेरिकेची झोप उडविली आहे. आणि हा किटक दुसरा तिसरा कुणीही नाही तर तो आहे ढेकूण. प्रत्येक संकटावर मार्ग काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या महासत्तेने ढेकणांपुढे सपशेल हात टेकले आहेत असे सांगितले जात आहे.

«असे सांगतात की १९५० ते १९९० या काळात अमेरिकेत ढेकूण नव्हते. मात्र यानंतर दुसर्‍या देशातून अमेरिकेत येणार्‍यांची संख्या वाढू लागली आणि या स्थलांतरीतांनी त्यांच्यासोबत ढेकूण आणले आता या ढेकणांच्या फौजा अमेरिकेची नींद हराम करत आहेत. बेड बग कंट्रोल सर्व्हीसला त्यामुळे इतकी प्रचंड मागणी येते आहे की हा व्यवसाय २०२० पर्यत १ अब्ज डॉलर्सची उलाढाल करेल असा अंदाज वर्तविला जात आहे.


पेस्ट कंट्रोल कंपनी अर्कीन यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील बाल्टीमोर शहर सर्वाधिक ढेकूण असलेले शहर असून त्यानंतर वॉशिंग्टन, शिकागो, लॉस एंजेलिस, कोलंबस या शहरांचा नंबर आहे. प्रवाशांचा वाढता ओघ व ढेकणांत वाढलेली औषध प्रतिकार क्षमता यामुळे हा प्रश्न फार गंभीर बनला आहे. हॉटेलांच्या सर्वेक्षणात असे दिसले आहे की कुठल्याही खोलीत ढेकूण सापडला तर हॉटेलला त्यासाठी ६३६८ डॉलर्स खर्च करावा लागतो. सर्व सामान काढणे, पेस्ट कंट्रोल व प्रवाशांनी ठोकलेल्या दाव्यांपोटी द्यावी लागणारी भरपाई हा भुर्दंड वेगळा.

शास्त्रीय माहितीप्रमाणे ढेकूण त्याच्या वजनाच्या सात पट रक्त शोषून घेतात. एक ढेकूण दिवसाला पाच अंडी घालतो तर त्याच्या संपूर्ण जीवनकाळात ५०० अंडी घालतो. त्याच्यावर अतिउष्णता, अतिथंड असल्या हवेचा कोणताही विपरित परिणाम होत नाही व कांहीही न खातापिता तो दीड वर्ष जिवंत राहू शकतो.