आप सरकार दिल्लीतील ७७ हजार ज्येष्ठ नागरिकांना घडवणार मोफत तीर्थयात्रा


नवी दिल्ली – आता दरवर्षी ७७ हजार ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांहून अधिक वय) मोफत तीर्थयात्रेची सुविधा दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार देणार असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. ३ लाख रूपयांपेक्षा कमी ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न आणि सरकारी किंवा स्वायत्त संस्थेचे जे कर्मचारी नाहीत, या सुविधेचा लाभ त्यांना घेता येईल. ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना’ असे या योजनेचे नाव असेल.

सिसोदिया म्हणाले, ज्येष्ठांना या योजनेतंर्गत तीर्थयात्रेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धार्मिकस्थळांमध्ये मथुरा-वृंदावन-आग्रा-फत्तेपूर सिक्री, हरिद्वार-ऋषिकेश-नीलकंठ, पुष्कर-अजमेर, अमृतसर-आनंदपूर साहिब आणि जम्मू-वैष्णो देवी मंदिराचा समावेश आहे. ज्येष्ठांना यातील स्थान निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. यात प्रवास खर्च, निवासस्थान आणि जेवण्याची सोय केली जाईल. प्रत्येक यात्रेकरूसाठी ७ हजार रूपये खर्च येतील.

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा एक परिचारक ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर ठेऊ शकतात. त्याचा खर्चही सरकार करेल. ही यात्रा तीन दिवस आणि दोन रात्रीसाठी असेल. प्रत्येकवर्षी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून ११०० ज्येष्ठ नागरिक निवडले जातील. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, संबंधित आमदार किंवा तीर्थयात्रा समितीच्या माध्यमातून ऑनलाइन भरता येईल. ड्रॉ काढून यात्रेकरूंची निवड केली जाईल. ही यात्रा कधी सुरू होईल हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Leave a Comment