राष्ट्रपतीभवनाला भेट द्या- राष्ट्रपती कोविद यांचे जनतेला आमंत्रण


आपल्यापैकी बहुसंख्य जणांनी आजपर्यंत आपले राष्ट्रपतीभवन फक्त चित्रातूनच पाहिले असेल. मात्र आता राष्ट्रपतीभवन सर्वसामान्य नागरिकांनाही पाहता येणार आहे. आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय जनतेला राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी आमंत्रित केले असून लोकशाहीच्या या प्रतीकात सर्वांचे स्वागत आहे ते पाहायला जरूर या कारण ते सर्व देशवासियांचे आहे असे ट्विट केले आहे.

राष्ट्रपतीभवन हे सरकारी निवासस्थान असून जगात ते तीन नंबरचे मोठे सरकारी निवासस्थान आहे. १९५० पर्यंत ते व्हॉईसरॉय हाऊस नावाने ओळखले जात असे. या भवनात ३४० खोल्या आहेत मात्र आपले राष्ट्रपती व्हॉईसरॉय जेथे राहात असत तेथे राहात नाहीत तर ते अतिथी कक्षामध्ये राहतात. या इमारतीच्या बांधकामासाठी ७० कोटींहून अधिक विटा व ३५ लाख घनफूट दगड वापरला गेला असून या बांधकामात लोखंडाचा वापर अगदी कमी आहे. २९ हजारांहून अधिक मजूर या इमारतीच्या उभारणीसाठी १७ वर्षे सतत काम करत होते. येथून ३०० कुटुंबांचे स्थलांतर करून ही इमारत उभारली गेली.

ब्रिटीश वास्तूरचनाकार सर एडविन लँडसिएर लुटियन्स यांच्याकडे या इमारतीच्या उभारणीची जबाबदारी सोपविली गेली होती. राष्ट्रपतीभवनासमोर ब्रिटीश व मुगल शैलीच्या संयोगातून सुंदर मुघल गार्डनची उभारणी केली गेली आहे.१३ एकर जागेतील या उद्यानात जगातील बहुतेक सर्व प्रकारची फुलझाडे आहेत. फेब्रुवारी मार्चमध्ये हे गार्डन सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुले केले जाते.

राष्ट्रपतीभवन आतून पाहायचे असेल तर त्यासाठी ५० रूपये भरून ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर तुम्हाला वेळ ईमेल अथवा एसएमएस करून कळविली जाते. आता प्रवेश करताना अधिकृत ओळखपत्र लागते. आठ वर्षाखालील मुलांना तिकीट नाही तसेच ग्रुप बुकींग केल्यास २० टक्के सवलत मिळते.

Leave a Comment