आता कानात बोट घाला, फोनवर बोला


मोबाईल कम्युनिकेशन जगात कांहीही घडू शकेल यावर आता सर्वांचाच विश्वास बसला आहे. दक्षिण कोरियातील कंपन्यांनी एकसोएक भारी स्मार्टफोन जागतिक बाजारात उतरविले आहेत. तेथील एका स्टार्टअप कंपनीने आता एक मजेदार रिस्ट बँड तयार केला आहे. हा रिस्ट बँड मनगटावर बांधला की युजर फकत कानात बोट घालून आलेले कॉल घेऊ शकणार आहे तसेच त्याला हव्या त्या नंबरवर कॉल लावू शकणार आहे. एसजीएनएल असे या रिस्ट बँडचे नामकरण केले गेले आहे.

इनोमडल लॅबने हा रिस्ट बँड तयार केला आहे. यामुळे युजरची बोटेच फोन स्पीकरचे काम करणार आहेत. त्यासाठी युजरने हा बँड मनगटावर बांधायचा व ब्ल्यू टूथ हेडसेटप्रमाणे प्रथम हा बँड स्मार्टफोनशी जोडायचा आहे. त्यानंतर युजरने कानात बोट घातले की झाले काम. यात तुम्हाला येणार्‍या कॉलवरून बोलणार्‍याचा आवाज स्वच्छ ऐकू येईल व आजूबाजूच्या गर्दीचा आवाज आपोआपच कमी होईल. यात युजरला बोट कानात घालून कॉल करता येईल तसेच नोटिफिकेशन पाहता येणार आहेत तसेच फिटनेस ट्रॅकरच्या सहाय्याने हेल्थ मॉनिटर करता येणार आहे. कॉल आला की बँड व्हायब्रेट होईल व बँडवर असलेले एक बटण आहे ते प्रेस केल्यावर कॉल रिसिव्ह करता येणार व कानात बोट घातल्यानंतर आवाज ऐकू येणार आहे. या डिव्हायसेसची ऑनलाईन विक्री मार्च २०१८ पासून सुरू होणार आहे.

Leave a Comment