अंगाला सतत खाज सुटते का? मग तुमच्या आहाराकडे लक्ष द्या


आताच्या काळामध्ये आपल्या खानपानाच्या सवयी आणि आपल्या आसपासचे वातावरण फार झपाट्याने बदलत आहे. प्रदूषण, धूळ, रस्त्यावरील अखंड धावत असणाऱ्या गाड्यांचा धूर, या सर्व गोष्टींमुळे तब्येतीच्या नाना तक्रारी सतत उद्भवत असतात. तसेच अलीकडच्या काळामध्ये सतत फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ यांचे सेवन आपल्या आहारामध्ये वाढल्याने शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होत आहे. अशामध्ये प्रत्येकाला कशाची ना कशाची अॅलर्जी देखील उद्भवत असते. कोणाला धुळीची अॅलर्जी, कोणाला धुराची, कोणाला उन्हाची, तर कोणाला निरनिराळ्या अन्नपदार्थांची. धुळीच्या किंवा धुराच्या मुळे उद्भविणाऱ्या अॅलर्जीच्या परिणामस्वरूप खोकल्याची ढास येणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अश्या तक्रारी दिसून येतात. मात्र अंगाला सतत खाज सुटत असेल, तर ही अॅलर्जी आपल्या आहारातील काही अन्नपदार्थांमुळे असू शकते. अश्या वेळी आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपण खात असलेल्या अनेक अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम खाण्याचे रंग वापरलेले असतात. या रंगांमध्ये अनेक तऱ्हेची रसायने असतात. पिवळ्या रंगामध्ये ऑरामीन आणि मेटानील ही रसायने असतात. याच रसायनांमुळे पेये, मिठाया आणि मसाल्यांना पिवळा रंग येतो. या रसायनांच्या अतिसेवनाने किडनी आणि लिव्हरवर दुष्परिणाम होऊ शकतात. मेटानील या रसायनामुळे आतड्यांच्या लायनिंगला हानी पोहोचू शकते.

खाण्याचा कृत्रिम लाल रंग लहान मुलांच्या कँडी, व निरनिराळ्या पेयांमध्ये वापरला जातो. एरीथोसीन रेड आणि अल्युरा रेड या रंगांच्या वापरावर अनेक देशांमध्ये बंदी आहे, कारण हे दोन रंग मानवी शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच खाण्याच्या निळ्या आणि हिरव्या रंगांवर देखील अनेक देशांवर बंदी आहे.

बेकरीमध्ये बनविल्या जाणाऱ्या पदार्थांना बेकिंग साठी कमी वेळ लागावा या करिता पोटॅशियम ब्रोमेड वापरले जाते. या रसायनाच्या वापरामुळे ब्रेड इत्यादी पदार्थ जास्त वेळ ताजे राहतात, आणि त्यांचा आकारही टिकून राहतो. पण या रसायनाचे दुष्परिणाम मानवी शरीरावर दिसून येत आहेत. या रसायनामुळे हार्मोन्स चे असंतुलन, कर्करोग इत्यादी विकार उद्भवू शकतात. बन सारखे पदार्थ नरम राहण्यासाठी अझोडायकार्बनामाईड सारखे पदार्थ वापरले जातात. या रसायानामुळे श्वसनासंबंधी विकार उद्भविण्याची शक्यता असते.

जॅमसारख्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हलक्या प्रतीच्या स्टार्च, फ्रुक्टोजची मात्रा जास्त असणारे कॉर्न सिरप, आणि साखर या सर्व पदार्थांमुळे जॅम आणि तत्सम पदार्थांचे सेवन हानिकारक ठरू शकते. तसेच यामध्ये वापरले जाणारे सल्फर डायऑक्साईड आणि सॉर्बिक अॅसिड यांच्यामुळे देखील शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

Web Title: Does the Anabolic continuous itching? Then pay attention to your diet