हिवाळ्यातील मटार सेवन देईल आरोग्यप्राप्ती


जगभरात सर्वत्रच ठराविक ऋतुमानात ठराविक भाज्या,फळे, धान्ये येतात आणि अशा वस्तूंचे सेवन हे हवामानानुसार त्या त्या काळात शरीरासाठी पोषकही असते हे सर्वांनाच माहिती आहे. हिवाळ्याच्या दिवसांत येणार्‍या हिरव्यागार मटाराचे सेवनही असेच शरीरासाठी पोषक आहे. मटारमध्ये फायबर आणि अँटी ऑक्सिडंट तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात व त्याचा फायदा अनेक तर्‍हेच्या व्याधी कमी करण्यासाठी होत असतो. यामुळे हिवाळ्यात शक्य असेल तितके मटार, मटाराचे पदार्थ आहारात आवर्जून समाविष्ट केले पाहिजेत.

मटारामुळे हृदयरोगासारख्या गंभीर व्याधींबरोबर लढण्याची ताकद शरीराला मिळते. हिरव्या मटारात उष्मांके कमी असतात व चवीला तो उत्तम असतो त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही त्याचा फायदा होतो. १०० ग्रॅम मटारात फक्त ३५ कॅलरीज असतात त्यामुळे भूक तर भागतेच पण वजनही नियंत्रणात ठेवण्यास उपयोग होतो. मटारात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने उत्साह अधिक वाढतो तसेच वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठीही मटारांचे सेवन फायदेशीर ठरते म्हणजेच म्हातारपण दूर ठेवता येते. मटाराच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते तसेच कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी होऊन हदयविकारापासून संरक्षण मिळू शकते. मटारात मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आहे त्यामुळे डायबेटीस टूच्या रूग्णांना त्याचा फायदा होतो. अन्नपचनासाठी आवश्यक असलेले जिवाणू अॅक्टीव्ह करण्यास मटार सहाय्यक आहे.


ज्यांना मटार आहारात घेणे आवडत नाही ते मटाराच्या सहाय्याने बाह्य उपचारही करू शकतात. मटाराची पेस्ट करून अर्धा तास चेहर्‍यावर लावून नंतर पाण्याने चेहरा धुतला तर चेहरा तजेलदार बनतो. नित्य वापराने चेहर्‍यावरील सुरकुत्या, काळे डाग कमी होतात, मटाराचे दाणे भरड वाटून त्याचा स्क्रब सारखाही वापर करता येतो. मटाराच्या लेपामुळे त्यातील प्रोटीन त्वचेचे चांगले पोषण करते. भाजल्यास अथवा कापलेल्या जखमेची आग होत असल्यास त्यावर मटार पेस्टचा लेप लावला तर त्वचेची आग कमी होऊन गार वाटते. मटार कच्चा, शिजवून कसाही खाल्ला तरी त्याचे फायदे मिळतात.

Leave a Comment