नेपाळात अजूनही चालताहेत जुन्या ५०० व १ हजारच्या नोटा


गेल्यावर्षीच भारतीय चलनातून रद्द केल्या गेलेल्या रूपये ५०० व १००० च्या जुन्या नोटा नेपाळमध्ये अजूनही चालत असल्याचे दिसून आले आहे. या जुन्या नोटा बार व कॅसिनोमधून स्वीकारल्या जात आहेत. नेपाळ राष्ट्र बँक व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये भारतीय चलनातून रद्द झालेल्या या नोटा कशा बदलून द्यायच्या या संदर्भातला निर्णयच अद्याप झालेला नसल्याने नेपाळमध्ये या नोटा स्वीकारल्या जात आहेत असे समजते. अर्थात कॅसिनो व बारमालक जुन्या १ हजार नोटेच्या बदली ८०० नेपाळी रूपये व ५०० च्या ऐवजी ४०० नेपाळी रूपये देत आहेत.

भारतातून नेपाळमध्ये जाऊन या नोटा आजही बदलणारयांचे प्रमाण मोठे असल्याचे समजते. अर्थात कॅसिनो मालक अथवा बार मालक मोठ्या रकमा देणार्‍यांना त्यासाठी सहकार्य करत आहेत. म्हणजे भारतीय नोटांच्या बदली तेथील टोकन खरेदी करता येतात व कॅसिनोमध्ये त्यावर खेळून मिळणारा पैसा नेपाळी चलनात घेता येतो आहे. एकट्या काठमांडूतच असे दोन हजारांहून अधिक बार व कॅसिनो आहेत.

रद्द झालेल्या भारतीय चलनाचे काय करणार याविषयी सांगताना एक कॅसिनोमालक म्हणाला भारत सरकार जेव्हा नेपाळकडे या नोटा बदलून देण्यासाठी मागवेल तेव्हा कॅसिनोत जमलेली रक्कम नेपाळी खासगी बँकांच्या मार्फत बदलून घेतली जाईल. त्यात खासगी बँकांनाही चांगली कमाई करण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Comment