चलो अहमदाबाद- पतंग महोत्सव सुरू झाला


साबरमती रिव्हर फ्रंट किनार्‍यावर गुजराथचा जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू झाला असून हा महोत्सव ७ जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. यंदा या महोत्सवासाठी ४४ देशांतून स्पर्धक आले असून या महोत्सवाचे उद्धाटन रविवारी राज्यपाल ओ.पी. कोहली तसेच मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या हस्ते झाले आहे.

यंदाही दरवर्षीप्रमाणे अनेक प्रकारचे पतंग आकाशात झेपावले असून त्यात कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानातून सुटका या थीमवरही पतंग आहेत. नाग, कमळे, विविध प्राणी यांच्या आकाराचे महाकाय पतंग आकाश व्यापून राहिले असून या उत्सवानिमित्ताने २ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. या दरम्यात ५७२ कोटींची उलाढाल होत असल्याचेही सांगितले जात आहे. अहमदाबादशिवाय अन्य शहरातही पतंग महोत्सव साजरे होत आहेत.

यंदा चिनी ड्रॅगन व मलेशियाचा रिमोटच्या सहाय्याने उडणारा पतंग विशेष आकर्षण ठरला आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंड, कॅनडा, अर्जेंटिना, ब्राझील, बेल्जिमय, कंबोडिया, फ्रान्स, इंडोनेशिया, इटली अशा ४४ विविध देशातून पतंगबाज आले आहेत. यंदा पतंगांवर जीएसटी लागू झाला आहे त्यामुळे पतंग व्यावसायिकांना थोड्या अडचणी येत असल्याचेही सांगितले जात आहेत कारण पतंगांच्या किंमती वाढल्या आहेत . गुजराथेतून या काळात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातही पतंग पाठविले जातात त्यावरही जीएसटी द्यावा लागतो आहे असे समजते.

Leave a Comment