घोरण्यास प्रतिबंध करणारी स्मार्ट गादी


रात्रीच्या झोपेमध्ये दुसर्‍याच्या घोरण्याचा व्यत्यय येणे याचा अनुभव अनेकजण घेत असतात.घोरण्याचा हा त्रास कसा थांबवावा हे घोरणार्‍यांनाही समजत नाही तसेच त्यांच्या घोरण्यामुळे झोप गमवावी लागलेल्या दुसर्‍या लोकांनाही समजत नाही. पण आता मात्र ही काळजी व समस्या दूर होऊ शकणार आहे. कारण घोरण्यास प्रतिबंध करणारी स्मार्ट गादी तयार झाली असून ती लवकरच बाजारात विक्रीसाठी येत आहे.

स्लीप कंपनीने ही गादी तयार केली आहे. लास वेगास येथे नुकत्याच पार पडलेल्या सीएफएस व्यापार मेळ्यात ती सादर केली गेली. या गादीचे वैशिष्ठ म्हणजे दोन्ही पार्टनर ज्या पद्धतीने झोपतील त्यानुसार म्हणजे त्यांच्या शरीराच्या आकारानुसार ती शेप घेते. कुशी बदलली, पालथे, झोपले त्यानुसार ती आकार बदलते. प्रत्येकाच्या पाठ, पोट, कुशीनुसार तिचा आकार बदलतो. त्यासाठी गादीत हवेचे दोन भाग बनविले गेले आहेत. तुम्ही घोरायला कधी सुरवात करणार याचा अंदाज घेऊन ती त्यानुसार तुमच्या झोपेच्या पोझमध्ये बदल घडविते.

थंडीत ही गादी तुमचे पाय गरम राखते. तुम्ही कधी झोपलात, कधी जागे झालात याच्या नोंदी घेते. गादीला स्मार्ट अलार्मची सुविधा आहे. त्यानुसार जेव्हा तुमची गाढ झोप असेल तेव्हा ती तुम्हाला जागे करणार नाही तर तुमची झोप हलकी असेल तेव्हाच जागे करेल असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment