मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देणे गरजेचे


आजकालच्या कॉम्प्युटर आणि त्याच्या जोडीने इतरही निरनिराळ्या गॅजेट्स च्या युगामध्ये मुलांचा बहुतांश वेळ हातामधल्या मोबाईल्स, टॅब्स, किंवा टीव्ही, कॉम्प्युटर गेम्स यामध्येच जातो. पालकांना देखील मुलांसाठी फारसा वेळ देता येत नसल्यामुळे मुलांना टीव्ही लाऊन देणे किंवा मोबाईलवर गेम्स खेळू देणे हा सोपा पर्याय पालकांनी स्वीकारला आहे. आधीच्या काळी मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाचन शिबिरे असायची, शाळांमधून ग्रंथालयाचे देखील तास असायचे, घरोघरी ग्रंथालयांचे सभासदत्व घेऊन घरामध्ये मोठ्यांना आणि लहानांना आवडतील अशी पुस्तके आवर्जून आणली जायची. पण आजच्या यंत्रांच्या युगामध्ये पुस्तकांचे ते रंगेबिरंगी विश्व मागे राहून गेले आहे. पुस्तके वाचून मिळणारा आनंद, त्यामधील कथेचे थेट ह्रदयाला जाऊन भिडणारे वर्णन, ह्याचा अनुभव आजच्या पिढीला मिळणे हे देखील गरजेचे आहे. त्यासाठी मुलांची मैत्री पुस्तकांशी करून देणे अगत्याचे आहे. त्यासाठी पालक म्हणून तुम्ही काही गोष्टी विचारात घेऊ शकता.

अगदी लहान वयापासूनच मुलांची ओळख पुस्तकांशी करून द्या. आजकाल अतिशय आकर्षक, रंगेबिरंगी, थ्री-डी पुस्तके बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत. ही पुस्तके मुलांसाठी आणून त्यामधील चित्रांच्या मदतीने मुलांना गोष्टी सांगता येतील. ही चित्र अतिशय आकर्षक असल्याने मुलांना आवडतात, व त्या चित्रांच्या मदतीने सांगितलेली एखादी कथा मुलांना आपोआपच आवडू लागते. तसेच मुलांबरोबर तुम्हीही त्यांच्यासाठी आणलेली पुस्तके वाचा. त्यामुळे वाचनामध्ये मुलांचा रस आणखीन वाढेल.

मुलांना कशा प्रकारची पुस्तके वाचायला आवडतील याचा विचार करून पुस्तके आणा. काही मुलांना परीकथा आवडतात, काहींना रहस्यकथा, काहींना विनोदी लेखन आवडते, तर काहींना विज्ञानकथा आवडतात. आपल्या मुलाचा कल कुठल्या प्रकारच्या वाचनाकडे जास्त आहे, हे लक्षात घेऊन त्या प्रकारची पुस्तके मुलांना द्या. मुले मोठी असतील, तर त्यांना कशा प्रकारचे वाचन करण्यास आवडेल, हे त्यांना विचारून घ्या, त्यांच्या आवडीची पुस्तके त्यांना निवडू द्या.

वाढदिवस, किंवा एखादी स्पर्धा जिंकल्याबद्दल किंवा इतरही प्रसंगी पुस्तके भेट म्हणून देता येतील. व्हिडियो गेम्स, मोबाईल यांच्या जोडीने पुस्तके वाचण्याचे महत्व मुलांना पटवून द्या. मुले वाचत असलेल्या पुस्तकांच्या कथानाकाबद्द्ल त्यांच्याशी चर्चा करा. कथानकाच्या विषयाबद्दल मुलांचे काय मत आहे, ते जाणून घ्या. आपले विचारही त्यांच्या समोर मांडा. पुस्तकांखेरीज मुलांना कॉमिक्स, वर्तमानपत्रे, मासिके इत्यादी वाचनाची सवय लावायला हवी. यामुळे मुलांचे सामान्य ज्ञान वाढण्यास मदत होईल.