गुगलची डुडलच्या माध्यमातून फिअरलेस नाडियाला मानवंदना


मुंबई – गुगलने आज आपल्या डुडलच्या माध्यमातून फिअरलेस नाडियाच्या ११०व्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना दिली आहे. १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना जे बी एच आणि होमी वाडिया यांनी केली होती. ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला त्यांनीच लाँच केले होते.

फिअरलेस नाडिया म्हणून त्या काळी प्रसिद्ध असलेल्या नाडियाचे खरे नाव ‘मेरी इवान्स’ असे होते. भारतात अनेक अॅक्शन चित्रपट मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने केले आणि ती अल्पावधीतच स्टार झाली. तिच्या बहारदार नृत्यासाठी, अ‍ॅक्शन्ससाठी ती प्रसिद्ध होतीच. शिवाय चाबूकवाली म्हणूनही तिला ओळखले जायचे. होमी वाडियाशी नाडियाने लग्न केले.

सध्या नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट तयार केला होता. त्याचे नाव ‘फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी’ असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती.

Leave a Comment