लग्न पहावे करून


आपल्याकडे एक म्हण आहे ती म्हणजे घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून. म्हणजे या दोन्ही कामात कोणत्या, कशा अणि किती अडचणी येतील किंवा किती प्रकारचे गोंधळ उडतील हे सांगता येणे अशक्य. त्यामुळे प्रत्येकाने स्वानुभव घ्यावा असा त्याचा अर्थ. पण कांहीही असले तरी लग्न म्हणजे प्रत्येकासाठी एक उत्सव असतो. सणसमारंभात जशी मजा, उत्साह असतो तसाच लग्नातही असतो. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा जागतिक विवाहदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. विवाह अनेक पद्धतीने व विविध रितीरिवाजानुसार साजरे होतात. या विवाहाविषयी काही मनोरंजक माहिती येथे देत आहोत.

लग्न म्हणजे वधू वर हवेत. आता कांही देशांनी समलिंगी विवाहांना परवानगी दिल्याने दोन पुरूष किंवा दोन बायका एकमेकांशी विवाह करू शकतात. फ्रान्समध्ये मृत व्यक्तीशी विवाह करता येतो. २००७ साली इरिका ला टू इफेल या युवतीने चक्क पॅरिसमधील लँड मार्क आयफेल टॉवर बरोबर विवाह केला आहे. म्हणजे आता विवाह दोन जिवंत व्यक्तींमध्ये होऊ शकतो याला हा अपवादच. आकडेवारी असेही सांगते की लव्ह मॅरेज नंतर ७५ टक्के घटस्फोट होतात तर भारतात ७४ टक्के पुरूष लव्ह मॅरेजऐवजी ठरवून केलेल्या लग्नाला पसंती देतात.


कट्टर मुस्लीम इराणी देशात दत्तक घेतलेल्या मुलीबरोबर वडील लग्न करू शकतात. भारतात एका व्यक्तीने अंधविश्वासातून कुत्र्याबरोबर लग्न केले होते. कांही निरीक्षणांनुसार भारतात ६० ट्कके मुली नकार दिलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करतात तर १८ टक्के मुली लग्नापूर्वी आपल्या नवर्‍याला ओळखत असतात. असेही सांगतात लग्नानंतरची सात वर्षे ज्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते ते आयुष्यभर सुखी राहतात. ज्या जोडप्यांच्या वयात जास्त अंतर असते त्यांचे घटस्फोटाची शक्यता वाढते. दरवर्षी दीड कोटी मुलींचे विवाह १८ वर्षांच्या होण्यापूर्वीच पार पडतात. तसेच प्रत्येक तीन जोडप्यांमागे १ आपल्या जोडीदाराच्या सवयींमुळे नाखूष असतो.

व्हिएतनाममध्ये लग्नापूर्वी वधूवराचे मानसिक संतुलन चांगले आहे असे सर्टिफिकेट घ्यावे लागते. ज्यांचे विवाह २८ ते ३२ या वयोगटात होतात त्यांच्यात घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे. लग्नानंतरचे तिसरे वर्ष जोडप्यासाठी सर्वाधिक आनंदाचे असते असेही सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

Leave a Comment