ट्रम्प यांचे ट्वीट काढण्यास ट्विटरचा नकार


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त ट्वीट डिलिट करण्यास ट्विटर कंपनीने नकार दिला आहे. जगातील प्रमुख नेत्यांचे ट्वीट वादग्रस्त असले तरी आम्ही काढून टाकणार नाहीत, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

“जगातील राजकीय नेत्यांच्या ट्विटर खात्यांचे कंपनीच्या दृष्टीने खास स्थान आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीवरून ते खाते व ट्वीट्स आम्ही नष्ट करू शकत नाही,” असे कंपनीने म्हटले आहे.

शासनप्रमुखांना ट्विटरपर्यंत पोचण्यापासून रोखले तर सामान्य लोकांना जी महत्त्वाची माहिती मिळणे आवश्यक आहे, ती गुप्तच राहील, असे कंपनीने आपल्या ब्लॉगवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्विटरचे मुख्य कार्यालय सान फ्रान्सिस्को येथे असून त्याच्या बाहेर काही लोकांनी निदर्शने केली होती. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त व भयानक ट्वीट काढून टाकावेत, अशी या लोकांची मागणी होती. ट्रम्प हे ट्विटरवर कायम राहिले तर जगाला असलेल्या धोक्यांमध्ये वाढ होईल, असे या निदर्शकांचे म्हणणे होते.

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडे असलेल्या अणुबॉम्बबाबत एक ट्वीट केले होते. तेव्हा ट्विटर हे हिंसाचाराच्या धमक्यांना परवानगी देत आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता.

Leave a Comment