आपल्या त्वचेची अशी घ्या काळजी


आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी, कोणत्याही महागड्या ट्रीटमेंट घेण्यासाठी, ब्युटी पार्लर्स मध्ये जाण्याची गरज नाही. त्याऐवजी घरच्या घरी काही उपायांनी आपल्या त्वचेची काळजी आपण घेऊ शकतो.

ओठ फाटत असल्यास लिपबाम वापरण्याऐवजी मधाचा वापर करावा. मधाचा वापर अनेक पॅक्स मध्ये केला जातो. त्वचेला आर्द्रता देणारा हा पदार्थ आहे. त्वचेवरील मृत पेशी हटविण्यासही मध सहायक आहे. मधामध्ये बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळून त्वचेला लावल्यास त्वचा मुलायम होते.

दररोज सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास गरम पाण्यामध्ये अॅपल सायडर व्हिनेगर घालून प्यावे. त्वचेवर येणारी मुरुमे, किंवा क्वचित एखादी रॅश येण्याचे कारण पचनसंस्था सुरळीत काम करत नसणे हे आहे. अॅपल सायडर व्हिनेगर घेतल्याने पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होऊन त्याच्याशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते. अॅपल सायडर व्हिनेगरच्या सेवानाने अॅसिडीटी होत नाही. तसेच शरीरातील कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. जर त्वचेवर मुरुमे येत असतील तर त्यासाठी ही अॅपल सायडर व्हिनेगर लावल्याने मुरुमे येणे कमी होऊन त्वचेचा पोत सुधारतो.

जर काही कारणाने डोळ्यांची किंवा त्वचेची जळजळ होत असेल, तर बर्फाचा वापर करावा. बर्फाचे तुकडे एका जाडसर टॉवेलमध्ये लपेटून त्याने हलका शेक घेतल्याने त्वचेवरील लाली, जळजळ किंवा खाज कमी होऊन जर सूज आली असेल तरी ती कमी होण्यास मदत होते. जर जागरणाने किंवा खूप वेळ कॉम्प्युटरवर काम केल्याने डोळे थकलेले असतील, डोळ्यांची जळजळ होत असेल, तर त्यावरही आईसपॅक्स ठेवावेत. मात्र त्वचेवर थेट बर्फ ठेऊ नये. बर्फ नेहमी कपड्यामध्ये लपेटूनच त्वचेवर लावावा.

आजकाल उन्हामुळे त्वचेवर आलेला काळसरपणा घालविण्यासाठी, किंवा त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी अनेक तऱ्हेचे फेस पॅक्स किंवा फेस मास्क्स बाजारामध्ये मिळतात. पण त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेवर अॅलर्जी येण्याची शक्यता असते. त्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेले फेस पॅक्स वापरणे कधीही चांगले. नुसते दही जरी त्वचेवर लावले, तरी त्यामुळे त्वचा उत्तम प्रकारे हायड्रेट तर होतेच, शिवाय उन्हामुळे आलेला काळसरपणा ही त्यामुळे कमी होतो.