लवकरच निर्माण केला जाणार जेएनपीटी ते दिल्ली नवीन रेल्वे कॉरिडॉर


रायगड – लवकरच जेएनपीटी ते दिल्ली असा नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण केला जाणार असून उरण आणि पनवेल तालुक्यातील भूसंपादनाची प्रक्रीया या कॉरिडॉरसाठी सुरू झाली आहे. जेएनपीटीतून आयात, निर्यात होणाऱ्या मालाची वाहतूक या रेल्वे कॉरिडॉरमुळे सोयीस्कर होणार आहे. हा कॉरिडॉर फक्त माल वाहतुकीसाठी बांधला जाणार आहे. हा कॉरिडॉर महाराष्ट्रातील ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातून जाणार आहे.

उरण तालुक्यातील जासई, पनवेल तालुक्यातील वहाळ, पाडेघर, वडघर, पिसार्वे आणि धानसर गावातील भूसंपादनाची प्रकीया या कॉरिडॉरसाठी सुरु झाली आहे. काही घरे या भूसंपादनामध्ये बाधित होणार असून त्यांना इंदिरा आवास योजने अंतर्गत घरे बांधून देण्यात येणार आहेत. या योजनेप्रमाणे ज्यांना घरे नको असतील त्यांना घराच्या बांधकामाला लागणारी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील रेल्वे व सिडको यांच्या जागेवर अतिक्रमण केलेली एकूण २८९ घरे बाधित होणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये उरण तालुक्यात देखील काही ठिकाणी उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत असलेली घरे बाधित होणार आहेत.

‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडीया’ या भारत सरकारच्या विभागाने हा कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उरण मेट्रो सेंटरच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे यासाठी रायगड जिल्ह्यातील भूसंपादनाची जबाबदारी देण्यात आली आहे. रेल्वे विभागाला हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यास परिपूर्ण व प्रभावशाली पद्धतीने ग्राहक सेवा पुरविणे व बाजाराच्या गरजा पुरविणे शक्य होणार आहे. लवकरात लवकर मालाची वाहतूक करण्यासाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे. कृषी क्षेत्रांपासून उद्योग क्षेत्रांना या कॉरिडोरचा फायदा मिळणार आहे.

Leave a Comment