रहस्यमयी १ हजार वर्षे जुने बृहदेश्वर मंदिर


तमीळनाडूतील तंजावर येथे असलेले बृहदेश्वर शिवमंदिर आजही संशोधकांसाठी रहस्यमयी मंदिर राहिले असून या मंदिराच्या भव्य शिखराची सावली जमिनीवर पडत नाही असे त्याचे वैशिष्ठ आहे. विशेष म्हणजे दुपारी मंदिराच्या सर्व भागांची सावली जमिनीवर पडते मात्र कळसाची सावली पडत नाही. ११ व्या शतकात चोल राजांनी बांधलेल्या या मंदिराची वास्तूकला, पाषाण व ताम्र शिल्पे कलेचा बेजोड नमुना समजली जातात. १९८७ साली या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे.


शैव पंथियांसाठी हे मंदिर अतिशय पवित्र मानले जाते. १०१० मध्ये राजाराम चोल याने हे मंदिर बांधल्याचे इतिहास सांगतो. २०१० साली या मंदिराला १ हजार वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरवातीला या मंदिराचे नामकरण राजराजेश्वर मंदिर असे केले गेले होते मात्र मराठा शासकांनी तंजावरवर केलेल्या आक्रमणानंतर त्याला बृहदेश्वर असे नांव दिले गेले. या मंदिरासाठी १ लाख ३० हजार टन ग्रॅनाईटचा वापर केला गेला असून हा दगड या परिसरात कुठेही मिळत नाही. त्यामुळे ग्रॅनाईटच्या इतक्या प्रचंड शिळा येथे १ हजार वर्षांपूर्वी कशा आणल्या गेल्या असतील याचेही गूढ आहे. मंदिर बांधताना ते लॉकींग पद्धतीने बांधले गेले असून कुठेही सिमेंट, चुना, रेतीचा वापर केला गेलेला नाही.

मंदिरावर सुवर्णकळस असून तोही एकाच अखंड दगडातून बनविला गेला आहे. या कळसाचे वजन आहे ८० टन. इतका मोठा कळस या १३ मजली २१८ फूट उंचीच्या मंदिरावर कसा चढविला गेला याचेही कुतुहल कायम आहे. जगातले हे सर्वात उंच मंदिर समजले जाते. असे सांगतात की ६ किमीचा रँप बनवून त्यावरून हा कळस हत्तींच्या सहाय्याने ओढून नेऊन बसविला गेला असावा. हे मंदिर तंजावर शहरातून कुठूनही दिसते.


मंदिरासमोर असलेला नंदी हा जगात दोन नंबरचा मोठा नंदी आहे. १६ फूट लांब व १३ फूट उंचीचा हा नंदी अखंड दगडातून कोरला गेला आहे.

Leave a Comment