Skip links

भारतात अण्वस्त्र बटण कुणाच्या हातात?


उ.कोरियाचा तानाशाह किम जोंग उन याने अण्वस्त्राचे बटण त्यांच्या टेबलावर असल्याचे अमेरिकेला सुनावले व त्या पाठोपाठ अमेरिकन अध्यक्षांनीही कोरियापेक्षा मोठे अण्वस्त्र बटण त्यांच्या हातात असल्याचे प्रत्युत्तर दिल्यानंतर अण्वस्त्रांचे बटण म्हणजे नक्की काय याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात मात्र असे बटण वगैरे कांही नसते तर हे बटण म्हणचे अण्वस्त्र हल्ला करण्याचे आदेश असा त्याचा अर्थ असतो. हा हल्ला करण्याचे आदेश देण्याचा अधिकार कुणाचा हे प्रत्येक देशाच्या धोरणांवर अवलंबून असते. जगात सध्या ९ देशांकडे अण्वस्त्रे असल्याचे सांगितले जाते.

भारताकडेही अण्वस्त्रे आहेत. बहुतेक अण्वस्त्रधारी देशांच्या राष्ट्रपतींकडे अण्वस्त्र हल्ला आदेश देण्याचे अधिकार असले तरी भारतात मात्र राष्ट्रपती तिन्ही सेनादलांचे प्रमुख असूनही हा अधिकार पंतप्रधानांकडे आहे. भारतात जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधून पंतप्रधानांची निवड केली जाते. पंतप्रधानांनाना अण्वस्त्र हल्ल्याचा आदेश देण्याचा निर्णय घेण्याअगोदर सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सेनादलांचे प्रमुख व ज्यांना प्रत्यक्षात हल्ला करायचा त्या स्ट्रॅटिजिक कमांडचे प्रमुख यांच्याशी विचार विनिमय करावा लागतो.


पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत मात्र त्यांच्याकडे हा अधिकार सेना जनरलकडे आहे व ते असे आदेश जारी करताना मनमानी करू शकतात. अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन या देशात अण्वस्त्राचे बटण राष्ट्रध्यक्ष किवा राष्ट्रपतींच्या हातात असले तरी त्यांनाही त्यापूर्वी सल्लामसलत करून मगच निर्णय जाहीर करावा लागतो. युके मध्ये हा अधिकार भारताप्रमाणेच पंतप्रधानांना आहे मात्र तेही सेनाप्रमुखांशी सल्लामसलत केल्यानंतरच हा निर्णय घेऊ शकतात. इस्त्रालयने नेहमीच त्यांच्याकडे अणस्त्रे असल्याचा इन्कार केलेला असला तरी या देशाकडे ६० ते ४०० च्या दरम्यान अण्वस्त्रे असावीत असे सांगितले जाते. येथे हा अधिकार कुणाचा हे अद्यपीही गुपित असले तरी तज्ञांच्या मते तो अधिकार राष्ट्रपतींकडेच असावा असे सांगितले जाते.