आहारातील साखर कमी करा, व त्याऐवजी हे नैसर्गिक स्वीटनर्स वापरा


आपल्या आहारातून साखरेला अजिबात फाटा देणे हा पर्याय केवळ मधुमेह असणाऱ्या, किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक नाही, तर अगदी तंदुरुस्त व्यक्तींकरिता देखील हे आवश्यक आहे. आपण नेहमी खातो ती पांढरी रिफाइंड साखर आरोग्यास हितकारक नाही, त्यामुळे त्याचे सेवन शक्य तितक्या कमी प्रमाणात करायला हवे. साखरेऐवजी वापरता येण्यासारखे कृत्रिम स्वीटनर्स देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण यांच्यामध्ये असलेले अॅस्पारटेम सारखे घटक शरीराला नुकसानकारक ठरू शकतात. अश्या वेळी संपूर्णपणे प्राकृतिक स्वीटनर्स चा उपयोग करण्याचा विचार करता येईल.

ऊसाचा रस निसर्गाने मानवाला दिलेले ‘ सुपर फ्लुइड ‘ म्हणता येईल. तसेच ऊसाचा रस घातल्याने पदार्थाला आलेला गोडवा वेगळाच, पण चविष्ट असतो. उत्तम एनर्जी ड्रिंक, स्कीन टोनर, शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करणारा असा हा ऊसाचा रस अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. पण याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये फारसा केलेला नाही. घराबाहेर पडल्यावर ऊसाच्या रसाचे गुऱ्हाळ दिसले, आणि रस पिण्याची इच्छा झाली तरच आपण रस पिण्याचा विचार करीत असतो. पण असे न करता ऊसाचा रसाचा आपल्या आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करा. आजकाल ऊसाचा हंगाम नसला तरी बाटल्यांमध्ये बंद ऊसाचा रस, किंवा कोल्ड प्रेस्ड ऊसाचा रस बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे.

मध हा पदार्थ साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतो. मध हे नैसर्गिक अँटी बायोटिक आहे. आपल्याकडे अनेक घरगुती औषधोपचारांसाठी मध वापरण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. यामध्ये प्रथिने, क्षार आणि जीवनसत्वे देखील आहेत. कच्चे मध पचनशक्ती चांगली बनविण्यास मदत करते. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने शरीर डीटॉक्सिफाय होते. एक चमचा मधामध्ये केवळ वीस कॅलरीज असल्याने वजन घटविण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

कोकोनट पाम शुगर हा देखील रिफाइंड साखरेला पर्याय आहे. यामध्ये लोह, झिंक, कॅल्शियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आहे. तसेच यामध्ये पॉलीफेनॉल्स आणि अँटी ऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचप्रमाणे सध्या स्टेविया नामक नैसर्गिक, झाडांपासून काढले जाणारे स्वीटनर बाजारामध्ये मिळत आहे, व लोकप्रिय देखील होत आहे. स्टेविया अनेक फ्लेवर्स मध्ये उपलब्ध असून, इतर कृत्रिम स्वीटनर्स मध्ये असणारे अॅस्पारटेम यामध्ये नाही. याच्या सेवनाने ब्लड शुगर किंवा इन्स्युलीन लेव्हल्स वर कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही