शहरात काम आहे पण शांतता नाही. कामाच्या रगड्याने उबून गेल्यानंतर कुठेतरी शांत जागी चार क्षण घालविण्याची इच्छा अनेकांना होते व त्यातूनच पर्यटनाचा पर्याय स्वीकारला जातो. मात्र आजकाल लोकप्रिय पर्यटनस्थळांवरही इतकी गर्दी झालेली असते की चार शांतीचे क्षण अनुभवास येणेही अवघड होते. एकांतप्रिय पर्यटकांसाठी कॅनडातील टिल्ट कोव्ह हे अतिशय सुंदर ठिकाण आहे.
एकांतप्रिय पर्यटकांसाठी मस्त ठिकाण टिल्ट कोव्ह
या सुंदर शहरात फक्त चार लोक राहतात. मात्र येथे पोस्ट ऑफिसपासून म्युझियम पर्यंत सर्व सुविधा आहेत.या शहरात राहणारे चार लोक तेथील व्यवस्थेची देखभाल करण्यासाठीच राहतात. कधी काळी हे शहरही गर्दीने गजबजलेले होते. कारण त्यावेळी येथे खाणी मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या.१९६७ सालापासून या खाणी बंद पडल्यानंतर लोकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली व त्यानंतर कामाच्या शोधात येथील नागरिक अन्य शहरात गेले तेव्हापासून हे गांव रिकामे पडले आहे. येथे आजही अनेक पर्यटक आवर्जून येतात ते बर्फाचा आनंद लुटण्यासाठी.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ येथे येण्यासाठी सर्वोत्तम आहे. यावेळी हिमवर्षावाचा आनंद लुटता येतो तसेच येथील पहाड, सुंदर झरे, धबधबे मनाला शांती देतात आणि शरीराला आवश्यक तो आरामही. येथे इच्छा असेल तर साहसी खेळांचा आनंद लुटता येतो.