ब्रिटीश शाही परिवाराच्या खान-पानाशी निगडीत काही ‘ हटके ‘ तथ्ये


ब्रिटीश शाही परिवार म्हटला, की त्यांच्याशी निगडीत सर्वच गोष्टी अगदी भव्य-दिव्य असतील असे आपल्याला वाटते. अगदी त्यांच्या राहणीमानापासून, ते त्यांचे पोशाख, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, सवयी सगळेच अगदी खास असेल अशी सर्वसाधारण समजूत आहे. शाही परिवारातील सदस्यांचे राहणीमान आणि पेहराव उंची असले, तरी त्यांच्या खानपानाच्या सवयी मात्र काहीशा हटकेच म्हणाव्या लागतील. त्यातून शाही परिवार मोठा असल्याने प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी सांभाळण्यासाठी प्रत्येकाचे खास शेफ सतत तैनातीला हजर असतात. शाही परिवारातील सदस्यांच्या खाण्यापिण्याच्या काही सवयी तर अगदी हटके म्हणाव्या लागतील.

दिवंगत प्रिन्सेस डायना खाण्या-पिण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ होती. सतत कोणती ना कोणती डायट ती पाळत असे. तिच्या भेटीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी जे जेवण बनविले जाई, त्यापेक्षा वेगळे, कमी कॅलरीज असलेले जेवण डायना साठी बनविले जाई. पण दोन्ही जेवणे इतकी सारखी दिसत, की पाहुण्यांना, डायना काही तरी वेगळे खाते आहे हे लक्षात येत नसे. मेजवानी मधील पदार्थ डायनासाठी देखील बनविले जात असत, पण त्यामध्ये कॅलरीज अतिशय कमी असत.

ब्रिटनची राणी एलिझाबेथ जेव्हा इंग्लंड मध्ये असते, तेव्हा तिला आठवड्याभरामध्ये बनणाऱ्या पदार्थांची यादी पाठविली जाते. त्यामधील जे पदार्थ राणी निवडते, तेच पदार्थ आठवड्याभरातील भोजनांमध्ये किंवा मेजवान्यांमध्ये बनविले जातात. पण राणी जेव्हा आपली वार्षिक सुट्टी घेण्यासाठी स्कॉटलंड मधील बाल्मोरल येथे जाते, त्यावेळी भोजनाची व मेजवान्यांची औपचारिकता येथे काहीशी शिथिल होते. काही वेळा राणी स्वतः तिच्या स्ट्रॉबेरीज् च्या बागांमध्ये जाऊन स्ट्रॉबेरी तोडून आणते आणि दुपारच्या जेवणामध्ये केवळ ताज्या रसरशीत स्ट्रॉबेरी खाते. राणीला चॉकोलेट केक अतिशय प्रिय आहे. त्यामुळे औपचारिक दौऱ्यासाठी जरी राणी बाहेर गेलेली असली, तरी तिचा चॉकोलेट केक देखील तिच्याबरोबर जातो. राणी एलिझाबेथला तिच्या जेवणामध्ये लसूण अजिबात पसंत नाही. तसेच आपल्या दिवसाचा शेवट राणी एक ग्लास उंची शँपेनच्या सेवनाने करते. तिच्या या सवयीमध्ये वर्षानुवर्षे कोणताही बदल झालेला नाही.

शाही परिवाराचे राजकुमार विलियम आणि हॅरी यांना फास्ट फूड अतिशय आवडते. त्यांची आई प्रिन्सेस डायना त्यांना पिझ्झा किंवा बर्गर्स खाण्यासाठी बाहेर घेऊन जात असे. शाही शेफ हे पदार्थ बनविण्यास तयार असत, पण तरीही दोन्ही राजकुमारांना बाहेर जाऊन फास्ट फूड खाणे आवडत असे. मॅक डॉनल्ड्स हे त्यांचे आवडते फास्ट फूड जॉइंट आहे. युवराज चार्ल्स हे ‘ ऑरगॅनिक ‘ फळे आणि भाज्यांबद्द्ल आग्रही असतात. शाही परिवारातील सदस्यांनी ‘ ऑइस्टर्स ‘ नामक समुद्री खाद्य खाऊ नये असा अलिखित नियम आहे. कारण त्याद्वारे विषबाधा होण्याची शक्यता आहे असे समजले जाते. पण युवराज चार्ल्स यांना मात्र ऑइस्टर्स अतिशय आवडतात.