आगळा वेगळा संकल्प


नवीन वर्ष सुरू झाले की लोकांमध्ये नव्या वर्षात कसले संकल्प करणार यावर चर्चा सुरू होते. व्यायामापासून ते सत्कर्मापर्यंत असे वैयत्कित आणि सामाजिक हिताचे संकल्प जाहीर केले जातात. काही संकल्प हे मनातल्या मनात केले जातात तर काही संकल्प प्रकट केले जातात. अर्थात जाहीरपणाने केलेले संकल्प सिद्धीस जातात की नाही याची कोणी खातरजमा करीत नाही. पण शेवटी संकल्प केवळ करून चालत नाही तर ते अंमलात आणावे लागतात. या बाबतीत मात्र आपण पुढे असतो. नव्या मुंबईत काही तरुणांनी नव्या वर्षात कसला संकल्प जाहीरच केला नाही पण तो एकदम सत्यात आणायलाच सुरूवात केली. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सरळ काम सुरू केले.

त्यांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजताच आपल्या कामाचा श्री गणेशा एका मोठ्या टोल प्लाझापासून केला. या तरुणांचा नवी मुंबइ नेटवर्किंग या नावाचा गट आहे. ही मुले पर्यावरण रक्षणाच्या कामात व्यग्र असतात. या वर्षी त्यांनी झाडांची स्वच्छता हाती घेतली. कोणाचीही परवानगी न घेता झाडांवर लावलेले जाहीरातीचे फलक, पाट्या त्यांनी उतरविल्या. या मोहिमेला त्यांनी न्यू इयर ट्री टॉप पार्टी असे नाव दिले आहे. अनेक लोक झाडांवर फलक लावतात आणि धातूच्या पाट्या ठोकण्यासाठी झाडांच्या बुंध्यावर खिळे ठोकतात. असे सगळे खिळे या मुलांनी झाडांवर चढून काढून टाकले आणि झाडांना या जाहीरातींच्या ओझ्यातून मुक्त केले. देशातली तरुणाई वाट चुकून चालत आहे अशी टीका करणारांना या मुला मुलींनी चांगले उत्तय दिले आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही.

सारी तरुणाई ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन साजरे करीत असताना आणि त्यातले अनेक तरुण मद्यप्राशन करून धुंद झाले असताना ही मुले मात्र सामाजिक काम करीत होती. नव्या मुंबईतल्या किरण ढवळे यांच्या श्री सद्गुरू एंटरप्रायझेस या संस्थेने ही मोहीम प्रायोजित केली असून निलेश कचरे याच्या नेतृत्वाखाली राबविली जात आहे. आपल्याला या कामाची प्रेरणा गटाचे प्रमुख संदीप शर्मा यांच्या पासून मिळाली असे निलेश कचरे याने सांगितले. ही वृक्षमुक्तीची मोहीम वाशी, नेरळ, बेलापूर, सानपाडा, कोपरखैरने या भागात राबविली गेली. संदीप शर्मा हे गेल्या दहा वर्षापासून असा उपक्रम हाती घेत आहेत. दर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ते तरुणांना हाताशी धरून असेच एखादे समाजोपयोगी काम हाती घेत आले आहेत. आपल्या या वर्षीच्या मोहिमेतून जाहीरातदारांना एक संदेश मिळेल अशी त्यांना आशा आहे.

Leave a Comment