भारतीय रेल्वेसंबंधीच्या मनोरंजक गोष्टी


दररोज सरासरी दोन कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या रेल्वेमध्ये दर दिवशी होत असलेल्या नवीन सुधारणांमुळे आणि हायटेक बनण्याच्या दृष्टीने केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे रेल्वे चर्चेत आहे. मात्र या रेल्वेसंदर्भात अधिक माहिती असणेही चांगलेच. त्यातही ही माहिती मनोरंजक असेल तर ती नक्कीच जाणून घ्यायला हवी.

भारतात १६ एप्रिल १८५३ ला पहिली रेल्वे धावली हे आपण जाणतो. भारताभर रेल्वेची ७५०० स्थानके आहेत आणि नवल म्हणजे त्यातील सर्वात व्यस्त स्थानक दिल्ली किंवा मुंबई नसून ते आहे लखनौ. दार्जिलिंग हिमायलन रेल्वेला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे. नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान गाडी असून सर्वात संथ जाणारी गाडी आहे निलगिरी. देशात सर्वाधिक लांबीचा रूट विवेक एक्स्प्रेस ही गाडी पार करते. ती आसाममधील दिब्रुगड पासून कन्याकुमारी पर्यंत ४२७३ किमीचे अंतर पार करून येते. तर सर्वात छोटा रूट आहे नागपूर अजनी. हा मार्ग केवळ ३ किमीचा आहे.


रेल्वे स्टेशनमधील सर्वात मोठ्या नावाचे स्टेशन चेन्नईतील वेंकटनरसिंहराजुवारिपेटा हे आहे तर सर्वात लहान नावाचे स्टेशन आहे ओरिसातील आयबी व गुजराथेतील ओडी.तिरूवनंतपुरम निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला फक्त दोन थांबे आहेत व हे अंतर आहे ५२८ किमी तर अमृतसर हावडा एक्स्प्रेसला तब्बल ११५ थांबे आहेत.गुवाहाटी तिरूवनंतपुरम ही दीर्घ अंतर तोडणारी रेल्वे नेहमीच १० ते १२ तास लेट असते. तिच्या नियमित प्रवासाची वेळ आहे ६५ तास ५ मिनिटे. रेल्वेचे सर्वात जुने इंजिन आहे फेअरी क्वीन. ते १८५५ मध्ये वापरात आले आहे.

रेल्वेमार्गावरील सर्वात मोठा बोगदा पीर पंजाल हा असून तो ११.२१५ किमी लांबीचा आहे. २०१२ मध्ये तो जम्मू काश्मीर मार्गावर बांधला गेला आहे. रेल्वेचा सर्वाधिक उंचीवरचा पूल चिनाब नदीवर ११८० फुटांवर बांधला गेला असून ही उंची कुतुबमिनारच्या पाचपट आहे. सर्वाधिक लांबीचा प्लॅटफॉर्म गोरखपूर येथे असून तो १.३५ किमी लांबीचा आहे.

Leave a Comment