आभानेरीची चाँद बावडी


ऐतिहासिक सौंदर्यासाठी जगभरातील पर्यटक आवर्जून जेथे भेट देतात त्या मरूभूमी राजस्थानमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. यात किल्ले, महाल, सरोवरे, स्मारके आहेत तशाच अनेक प्रसिद्ध बावडया किंवा विहीरीही आहेत. वैशिष्ठपूर्ण बांधणीच्या व अनेक दंतकथा प्रचलित असलेल्या या बावड्यांमधील सर्वात प्रसिद्ध आहे ती चाँद बावडी. दौसा जिल्ह्यातील आभानेर येथे असलेली ही बाबडी आठव्या शतकात राजा मिहीरभोज याने बांधल्याचे सांगितले जाते. या राजाला चाँद असेही नाव होते व त्यावरून ही बावडीही चाँद बावडी म्हणून ओळखली जाते.

या बावडीभोवतीही अनेक दंतकथा आहेत. ही बावडी एका रात्रीत बांधली गेल्याचे सांगतात तसेच ती भूतांनी बांधली असाही समज आहे.जगातील ही सर्वात खोल विहीर असून तिची खोली १०० फुटांपेक्षा जास्त आहे. तिच्या चारी बाजूंनी ३५ मीटर रूंदीचा कठडा आहे व या १३ मजली विहीरीला ३५०० हून अधिक पायर्‍या आहेत. पायर्‍यांचा भुलभुलैय्या हे या बावडीचे वैशिष्ठ. म्हणजे या पायर्‍या इतकया सारख्या आहेत की आपण कुठून खाली उतरलो त्याच मार्गाने परत जाणे अशक्य आहे.

या बावडीत तळमजल्यावर गणेश व महिषासूर मर्दिनीच्या प्रतिमा आहेत व तसेच येथून १७ किमी लांबीची एक गुहाही जाते. या गुहेचा वापर राजा व त्याचे सैनिक युद्धकाळात करत असत असे सांगतात. ही गुहा भांडारेज गावी निघते. इंग्रजी द फॉल या चित्रपटाचे तसेच भुलभुलैय्या सह अनेक हिंदी चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे. ही बावडी वॉटर हार्वेस्टिंगचा उत्तम नमुना मानली जाते. विहीरीच्या भितींवर चित्रेही रेखाटली गेली आहेत.
——–

Leave a Comment