कांगथोंग- मेघालयातील व्हिसलिंग व्हिलेज


भारताच्या कानाकोपर्‍यात अनेक प्रकारची वैशिष्ठ्ये असलेली अनेक खेडीपाडी आढळतात. इशान्येकडील मेघालय हे राज्यही याला अपवाद नाही. या राज्यात कांगथोंग नावाचे एक अदिवासी गाव असून जगभर या गावाची ओळख व्हिसलिंग व्हिलेज म्हणजे शिट्ट्या मारणारे गांव अशी आहे. या गावात खासी जमातीचे लोक राहतात व ते एकमेकांना हाक मारताना शिट्टी वाजवितात. विशेष म्हणजे प्रत्येकासाठी वेगळ्या प्रकारे शिट्टी वाजविली जाते.


या गावात प्रत्येक व्यक्तीला दोन नांवे आहेत. म्हणजे एक आपले नेहमीचे नॉर्मल नाव व दुसरे शिट्टी नाव. त्याला ट्यून नेम असेही म्हणतात. विशेष म्हणजे बाळाचा जन्म झाला की आईच त्याला हे ट्यून नेम देते. म्हणजे बाळासाठी ती विशिष्ट प्रकारे शिट्टी वाजविते. हळूहळू या शिट्टीची ट्यून बाळ ओळखू लागते व कधीही ही ट्यून ऐकू आली की आपल्याला कुणीतरी बोलावते आहे हेही त्याला कळते.

या गावात एकूण १०९ कुटुंबे आहेत व लोकवस्ती आहे ६२७. म्हणजे या गावात ६२७ वेगवेगळ्या प्रकारांनी शिट्टी वाजविली जाते. हे गांव पहाडांनी घेरलेले आहे. यामुळे हाक मारताना शिट्टीचा आवाज पहाडात घूमतो व योग्य व्यक्तीपर्यंत ही हाक पोहोचते. आता या गावातील लोकही आधुनिक होत आहेत. म्हणजे त्यांनी मोबाईल वापराची सुरवात केली आहे व त्याच्या ट्यून नेमचा ते रिंगटोन बनवू लागले आहेत.

Leave a Comment