वर्षभर हिमवर्षाव होणारे चीनमधील हार्बिन शहर


सुट्ट्यांचा मोसम आता संपण्याच्या मार्गावर आहे. आता पर्यटनाला जाण्यासाठी एप्रिल मेची प्रतिक्षा करावी लागणार. यंदा हिमवर्षाव पाहण्याची ज्यांची संधी हुकली असेल त्यांना अगदी उन्हाळ्यातही बर्फबारीचा मस्त अनुभव देणारे एक ठिकण चीनमध्ये आहे. या शहराचे नांव आहे हार्बिन. येथे वर्षभर हिमवर्षाव होत असतो. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात येथे एक महिन्याच्या उत्सव साजरा होतो ज्यात हे शहर बर्फापासून बनविलेल्या विविध कलाकृतींनी सजविले जात असते. या काळात जगभरातून केवळ पर्यटकच नाही तर या बर्फोत्सवात आपल्या कलेचे दर्शन घडविणारे अनेक कलाकारही येत असतात.


या शहरात जानेवारीत पोहणे, बर्फ बोटिंग सारख्या अनोख्या स्पर्धा घेतल्या जातातच पण या काळात येथे सामुदायिक विवाह समारंभही होत असतात. या काळात संपूर्ण शहरात जगभरातून आलेले कलाकार बर्फापासून इमारती, हॉटेल्स, मूर्ती, झाडे असे अनेक प्रकार बनवितात. त्यासाठी डिसेंबरपासूनच काम सुरू केले जाते. या बर्फाच्या इमारती अगदी दोन तीन मजल्यांच्याही असतात. अ्रनेक सुंदर महालही येथे बनविले जातात. रात्री त्यावर रंगीबेरंगी लाईटचा प्रकाश टाकला की स्वप्न नगरीत आल्याचा भास होतो. येथे होणारा लँटर्न शो व गार्ड पार्टी जगप्रसिद्ध आहे व त्यामुळेच प्रचंड थंडी असूनही पर्यटकांची येथे खूप गर्दी होते.

Leave a Comment