फोटोग्राफर्स साठी उत्तम पर्वणी ठरलेली काही उत्तम स्थळे


जगभरातील काही स्थळे अशी आहेत, जी फोटोग्राफर्स करिता अगदी पर्वणी ठरत आहेत. निसर्गाने नटलेली ही स्थळे फोटोग्राफर्स मध्ये अतिशय लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे खास फोटो काढण्यासाठी जे फोटोग्राफर्स पर्यटन करीत असतात, त्यांच्या साठी ही स्थळे निसर्गदत्त वरदान ठरीत आहेत. भारतामधील बांधवगड या अभयारण्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. रॉयल बेंगाल टायगर्स ची सर्वाधिक संख्या आढळणारे हे अभयारण्य आहे. त्यामुळे गर्द झाडीमध्ये अधून मधून होणारे वाघांचे दर्शन छायाचित्रांमधून टिपायच्या आशेने फोटोग्राफर्स बांधवगडला अवश्य भेट देताना दिसतात.

कॉस्टा रिका हा प्रदेश उष्ण कटिबंधातील असून, तिथे हर तऱ्हेचे वन्यजीवन आणि घनदाट जंगले यांचे अभूतपूर्व दर्शन घडत असते. हमिंगबर्ड पक्ष्याचे दर्शन ही येथील खासियत आहे. त्यामुळे फोटोग्राफर्स करिता या प्रदेशामध्ये फोटोग्राफी करता येणे ही एक उत्तम पर्वणीच म्हणायला हवी. काबिनी हे ठिकाण वर्षभरामध्ये कधीही जाऊन फोटोग्राफी करता येण्यासारखे आहे. या अभयारण्यामध्ये असणाऱ्या वन्यजीवांना पाहण्यासाठी तसेच फोटोग्राफीसाठी अनेक मोक्याची ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मेलानिस्टीक लेपर्ड, म्हणजेच ब्लॅक पँथर्स, या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहेत.

पूर्व आफ्रिकेतील केनिया आणि टांझानिया हे प्रदेश जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळे ठरत आहेत. फोटोग्राफर्स साठी ही स्थळे म्हणजे फोटोग्राफी साठी सुवर्णसंधी आहेत. या दोन्ही ठिकाणी हर तऱ्हेचे प्राणी दृष्टीस पडतात. लांबच लांब पसरलेली माळराने आणि असंख्य जातींचे प्राणी या ठिकाणची वैशिष्ट्ये आहेत. रशियामधील भौगोलिक आणि नैसर्गिक सुंदरतेच्या दृष्टीने उत्तम असलेले ठिकाण म्हणजे कामचात्का. हे ठिकाण मानवी वस्तीपासून दूरवर असल्याने काहीसे एकाकी आहे. समुद्राकाठी असलेल्या या ठिकाणी व्हेल्स चे दर्शन घडते. तसेच ब्राऊन बेअर्स चे दर्शन येथील खासियत म्हणता येईल.

जिम कॉर्बेट यांचे नाव दिलेल्या कॉर्बेट अभयारण्यामुळे उत्तराखंडातील कुमाऊं हा प्रांत जगभरात प्रसिद्ध झाला. ह्या अभयारण्यामध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था आहे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची उत्तम संधी पर्यटकांना येथे मिळते. या अभयारण्यामध्ये रॉयल बेंगाल टायगर आणि हत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने फोटोग्राफर्स करिता फोटोग्राफीची उत्तम संधी येथे मिळते.

Leave a Comment