भिजविलेले एक मुठ शेंगदाण्याचे नियमित सेवन आरोग्यास हितकारी


थंडीचा मोसम सुरु झाला की भाजेलेल्या भुइमुगाच्या शेंगांच्या गाड्या रस्त्यांच्या दुतर्फा दिसू लागतात. गुलाबी थंडीमध्ये भाजेलेल्या शेंगा खाण्याची मजा काही न्यारीच ! चविष्ट आणि आरोग्यास हितकारी असे हे शेंगदाणे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास सहायक आहेतच, शिवाय हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय फायदेशीर आहेत. पोटॅशियम, कॉपर, सेलेनियम, कॅल्शियम, लोह इत्यादी पोषक तत्वांनी युक्त असलेले शेंगदाणे भिजवून खाल्ल्यास त्याची पौष्टिकता अजून वाढते.

एखादे दिवशी वेळी अवेळी खाणे, किंवा पचण्यास जड पदार्थांचे सेवन जास्त केले, तर पोट जड होते. अस्वस्थ वाटू लागते, आणि काहीही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. हा त्रास ज्या व्यक्तींना वारंवार जाणवत असेल, त्यांनी दररोज रात्री एक मूठ शेंगदाणे भिजत घालवत, आणि सकाळी उठल्यावर हे शेंगदाणे खावेत. त्यामुळे पचनासंबंधीच्या तक्रारी दूर होतीलच, शिवाय अॅसिडीटीची तक्रार देखील दूर होते.

भिजविलेल्या शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने स्नायूंचे चांगले टोनिंग होते. शेंगदाण्यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असल्याने स्नायूंच्या मजबूतीसाठी शेंगदाणे उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे ज्यांचे स्नायू काहीसे ढिले पडले आहेत आणि व्यायाम करून देखील स्नायूंचे व्यवस्थित टोनिंग होत नाही, अश्या व्यक्तींनी शेंगदाण्याचे सेवन अवश्य करावयास हवे.

ज्या व्यक्तींना काही कारणामुळे सतत सांधे दुखीचा किंवा कंबरदुखीचा त्रास होत असेल, त्यांनी देखील शेंगदाणे रात्रभर भिजत घालून सकाळी त्याचे सेवन करावे. विशेषतः महिलांमध्ये कंबरदुखीचा त्रास जास्त आढळून येतो. अश्या महिलांनी भिजविलेल्या शेंगदाण्याचे सेवन अवश्य करावयास हवे. जोडीला गुळाचे सेवन ही करावे. त्याद्वारे शरीराला लोह आणि कॅल्शियम मिळते आणि सांधेदुखी व कंबरदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.

भिजविलेल्या शेंगदाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम, आणि झिंक ही पौष्टिक तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. या तत्वांमुळे शरीरामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या हानिकारक पेशी तयार होण्यास आळा बसतो. तसेच भिजविलेल्या शेंगदाण्यांच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. तसेच ज्यांना वारंवार घसा खराब होऊन खोकल्याचा त्रास होत असेल, त्यांनाही भिजविलेल्या शेंगदाण्याच्या सेवनाने आराम मिळतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment