आता तुटलेली काच जुळणार आपोआप


तुटलेल्या काचेचे तुकडे एकमेकांवर ठेवून केवळ दाबले तरी ते एकमेकांशी जुळतील, अशी काच जपानमधील संशोधकांनी तयार केली आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या काचेमुळे सामान्य काचेचे आयुष्य तीनपट वाढेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

टोकियो युनिव्हर्सिटीतील यू यानागिसावा या शास्त्रज्ञांनी अशा प्रकारची काच तयार करण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे ओल्या पृष्ठभागाला जोडणाऱ्या डिंकाचे संशोधन करताना अनपेक्षितपणे त्यांना ही पद्धत सापडली.

यानागिसावा यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत एका काचेचे दोन तुकडे केले. त्यानंतर त्यांनी दोन्ही तुकड्यांच्या तुटलेल्या बाजू एकमेकांवर ठेवून सुमारे 30 सेकंद दाबून ठेवले. तेव्हा हे तुकडे असे जुळले, की जणू ते कधी तुटलेच नव्हते. पॉलिथर थुयोरियस नावाच्या पदार्थापासून ही काच बनलेली असून ती खनिज काचेच्या तुलनेत अॅक्रिलिक काचेसारखी असते. खाण्या-पिण्याची भांडी किंवा स्मार्टफोनचे स्क्रीन तयार करण्यासाठी या काचेचा उपयोग होतो.

अर्थात स्मार्टफोनवरील भेगांवर बोट दाबून किंवा बीयरच्या ग्लासचे तुकडे इतक्यातच जुळणार नाहीत. परंतु अधिक टिकाऊ आणि हलक्या काचा बनविण्यासाठी आता या शोधामुळे शास्त्रज्ञांना एक संधी मिळाली आहे.

थियोरिया नावाच्या पदार्थामुळे हायड्रोजन बाँडिंगचा वापर केल्यास तुटलेल्या काचेच्या तुकड्यांच्या कडांमध्ये आपोआप जुळण्याचा गुण निर्माण होतो, असे यानागिसावा यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले.

Leave a Comment