जीएसटीनंतर ट्रक सुसाट, दररोज 100 किलोमीटर जास्त अंतर पार!


देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर ट्रकांचा वेग वाढला असून आता मालवाहतूक करणारे ट्क्र दररोज सरासरी 100 ते 150 किलोमीटर अंतर जास्त पार करत आहे, अशी माहिती परिवहन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी दिली आहे.

जीएसटीची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून सुरू झाली होती. जीएसटी लागू झाल्यापासून सहा महिने झाले आहेत. नव्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेचा प्रभाव असा आहे, की एका ट्रककडून पार केली जाणारे अंतर दररोज सरासरी 400 ते 450 किलोमीटरपर्यंत पोचले आहे, असे टीसीआई एक्स्प्रेस या लॉजिस्टिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सी. शर्मा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. यापूर्वी जागोजागी तपासणी नाके, बॅरिकेड आणि रस्ता कर इ. कारणांमुळे ट्रक 10 ते 12 तास उशिराने धावत असत आणि दररोज सरासरी 300 ते 350 किलोमीटर जात असत, असे ते म्हणाले.

जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या तुलनेत आता ट्रक सरासरी 100 ते 150 किलोमीटर अधिक अंतर जात असल्याचे टाइगर लॉजिस्टिक्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक हरप्रीतसिंह मल्होत्रा यांनी सांगितले. पथकर हटविण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा परिवहन कंपन्यांनाच नव्हे तर ग्राहकांनाही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment