नववर्षाच्या निमित्ताने हे संकल्प करा आणि दीर्घायुषी व्हा


आरोग्य विशेषज्ञांनी जगभरामध्ये अनेक देशांमध्ये सर्वेक्षण करून, लोक दीर्घायुषी कसे होतात या मागची रहस्ये शोधण्याचा प्रयत्न केला. या सर्वेक्षणांच्या अंतर्गत आरोग्य तज्ञांनी ‘ ब्लू झोन्स ‘ निश्चित केले आणि त्या झोन्स मध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनशैली पाहता, त्यांच्या दीर्घायुष्याची रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आरोग्य तज्ञांच्या मते, आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याची इच्छा आणि आरोग्य जपण्यासाठी काळजीपूर्वक सांभाळलेली जीवनशैली ही दीर्घायुष्याची दोन लक्षणे आहेत. ही लक्षणे आपण नववर्षांच्या निमित्तने संकल्प म्हणून स्वीकारली आणि त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्नपूर्वक अवलंब केला, तर आपले ही आयुष्य काही वर्षांनी निश्चितच वाढेल. याबाबतीत काही तत्वांचा अवलंब आपण नियमितपणे करणे अगत्याचे आहे.

आपल्या दैनंदिन कामांसोबत दिवसातील काही वेळ आपण व्यायामासाठी देणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये खूप वेळ बसून काम करावे लागते, अश्यांनी शारीरिक हालचालीवर विशेष भर द्यायला हवा. व्यायाम कोणत्याही प्रकारचा असो, त्यासाठी आपल्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये स्थान असायलाच हवे.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सतत कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावाखाली असतो. हा तणाव कमी व्हावा, मन शांत व्हावे म्हणून आपण आपल्या आवडीच्या कामांसाठी आवर्जून वेळ काढायला हवा. मग ते बागकाम असो, संगीत ऐकणे असो, फिरायला जाणे असो, किंवा अगदी टीव्ही बघणे असो. आपल्या आवडत्या कामांसाठी वेळ दिल्याने मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराला पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घ्यायला हवी.

कन्फ्युशियसची शिकवण ‘ हारा हाची बु ‘ आचरणात आणायला हवी. याचा अर्थ असा, की आपल्या पोटाची अन्नग्रहण करण्याची जितकी क्षमता आहे, त्या क्षमतेच्या ऐंशी टक्केच अन्न आपण ग्रहण केले पाहिजे. यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन, पचनाशी निगडीत समस्या उद्भवत नाहीत. असेच जपानी ‘ इकीगाई ‘ हे तत्व देखील आपण आचरणात आणयला हवे. याचा अर्थ असा, की आपल्या आयुष्याचे नेमके ध्येय काय आहे, आपण आयुष्य नेमके कशासाठी जगतो आहे, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

आपल्या आहारामध्ये आपण झाडांपासून आलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश जास्त करायला हवा. मांसाहारी पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे. तसेच मद्यपान किंवा अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन अतिशय मर्यादित प्रमाणात करावयास हवे. आपल्या आसपासच्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार आणणाऱ्या असाव्यात. अश्या व्यक्तींच्या सहवासात राहून आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही सकारात्मक होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment