२०१६-१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली; सरकारची कबुली


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत महिनाभरावर येऊ घातलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर वित्त क्षेत्रातील नियामकांची बैठक घेतली.

देशाचा आर्थिक विकास परदेशी तसेच देशांतर्गत वित्तीय गणित बिघडल्याने मंदावल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ मधील ८ टक्क्यांच्या तुलनेत गेल्या वित्त वर्षांत विकास दर कमी, ७.१ टक्के राहिल्याचे म्हटले आहे. या संथ अर्थव्यवस्थेला परदेशी तसेच देशांतर्गत आर्थिक, वित्तीय घटक जबाबदार असल्याचे जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात कमी झालेली ढोबळ स्थिर गुंतवणूक, कंपन्यांचा आर्थिक चणचणीचा ताळेबंद, बँकांमधील कर्जाचे कमी प्रमाणातील वितरण याचबरोबर जागतिक स्तरावरही विकास दर रोडावल्याचे कारण अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असल्याचे नमूद केले असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचेही जेटली म्हणाले. सरकार विविध उपाययोजना भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी करीत असून निर्मिती, वाहतूक, ऊर्जा, ग्रामीण पायाभूत, थेट विदेशी गुंतवणूक या क्षेत्रात कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Comment