चेटकिणींचे गांव


आजही अगदी प्रगत पाश्चात्य जगतातही चेटकीणी असतात यावर विश्वास ठेवला जातो. अमेरिका,ब्रिटनसारखी राष्ट्रेही त्याला अपवाद नाहीत.चेटकिण असल्याच्या संशयावरून महिलांना ठार करण्याचे अनेक प्रकारही नित्य घडतात. मग अफ्रिकेसारख्या मागास देशात काय परिस्थिती असेल याचा अंदाजच केलेला बरा. अफ्रिकेतील घाना देशात तर सहा गांवे अशी आहेत जी चेटकीणींची गांवे म्हणूनच ओळखली जातात. समाजातून बहिष्कृत करण्यात आलेल्या महिला या गावांत येऊन राहतात. म्युनिखची फोटोग्राफर क्रिस्टीन वाहलीने या गावांचे फोटो क्लिक करून समाजासमोर आणले आहेत.

चेटकीण असल्याचा शिकका बसलेल्या या महिलांचा दोष काय? तर कधी योगायोगाने म्हणा किंवा अन्य कोणत्या परिस्थितीत या महिला उपस्थित असताना कुणी साप चावून मेला अथवा पाण्यात बुडून मेला अथवा अन्य कारणाने त्याला मृत्यू आला तर त्याचा दोष महिलेवर टाकून तिला चेटकीण ठरविले जाते. यापूर्वी तर अशा महिलांना जिवंत जाळले जात असे किवा त्यांचा छळ केला जात असे. त्यामुळे या महिला अगोदरच गाव सोडून जायच्या. तेथून चेटकीणींच्या गावाची प्रथा पडली.

म्हणजे एखाद्या महिलेला चेटकीण घोषित केले गेले तर ती आपणहूनच गावाबाहेर जाते. मग अशा महिला या गावातून कायमचा मुक्काम करतात. त्या झोपड्यातून राहतात आणि शेतात कष्ट करून आपले पोट भरतात.अफ्रिकेत चेटकीणींची अशी सहा गावे असून त्यातील गांबागा, गुशीगू ही प्रमुख आहेत. या गावात राहणार्‍या महिलांना भेटायला त्यांचे कुटुंबियही येत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळखच बुजून जाते. समाजातून चेटकीणी म्हणून वेगळ्या पडलेल्या अशा सुमारे १५०० महिला या गावातून राहात आहेत.

Leave a Comment