ब्राऊन राईस खा आणि निरोगी रहा


तुम्हाला भात मनापासून आवडत असेल, पण वजन वाढेल या भीतीने तुम्ही तुमच्या आवडत्या अन्नपदार्थापासून लांब राहत असाल, तर आता तुम्हाला तुमचा मोह आवरण्याची जरा सुद्धा गरज नाही. तुम्ही तुमच्या आहारामध्ये ब्राऊन राईस समाविष्ट करा आणि वजन वाढेल याची काळजी न करता भाताचे सेवन करा. ब्राऊन राईस म्हणजे नक्की काय, तर पॉलिश न केलेल्या, अन-रिफाइन्ड तांदुळाला ब्राऊन राईस असे म्हटले जाते. तांदुळाच्या दाण्याला सालीची दोन ते तीन आवरणे असतात. ब्राऊन राईस तयार करण्यासाठी तान्दुळावरील केवळ सर्वात बाहेरची, जाडसर असलेली साल काढली जाते. बाकीच्या पातळ साली तांदुळावर तश्याच ठेवल्या जातात, म्हणूनच हा तांदूळ दिसायला ‘ ब्राऊन ‘, म्हणजेच भुरकट रंगाचा दिसतो. पांढरा तांदूळ तयार होताना त्यावरील सर्वच सालींची आवरणे काढून टाकली जातात, त्यामुळे तो तांदूळ शुभ्र पांढरा दिसतो. पण पांढऱ्या तान्दुळामध्ये केवळ स्टार्च असतो.

ब्राऊन राईस आणि पांढऱ्या तांदुळामध्ये कॅलरीज आणि कर्बोदकांचे प्रमाण जरी एकसमान असले, तरी पांढरा तांदूळ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये, त्यामध्ये असलेले बी३, बी१, बी६, ही जीवनसत्वे, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, लोह, फायबर आणि फॅटी अॅसिड्स ही पोषक तत्वे पूर्णतया नष्ट होऊन जातात. त्यामुळे पांढऱ्या तांदूळापेक्षा ब्राऊन राईसचे सेवन आरोग्यास अधिक हितकारी असल्याचे आहारतज्ञांचे म्हणणे आहे. ब्राऊन राईस मध्ये कर्बोदके, प्रथिने, फायबर, मॅग्नेशीयम, थियामीन, फॉस्फोरस, पोटॅशीयम इत्यादी महत्वपूर्ण पोषक तत्वे असून, याचे सेवन शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे आहे.

ब्राऊन राईस मध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असून, यामुळे रक्तामधील घातक कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तामधील शुगर नियंत्रित होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना याच्या सेवनाने विशेष फायदा मिळतो. फायबरचे प्रमाण यामध्ये जास्त असल्याने भूक शमते, तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होते. त्यामुळे बद्धकोष्ठ किंवा पचनाशी निगडीत इतर समस्या दूर होतात. फायबरमुळे कोलोन आणि पचनेन्द्रीयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत होते, व कोलेस्टेरोलचे प्रमाण नियंत्रित राहिल्याने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते.

ब्राऊन राईसमध्ये असलेल्या सेलेनियम आणि फेनोल्स या तत्वांमुळे कोलोन कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच ही तत्वे थायरॉइड ग्रंथीचे कार्य नियंत्रित करण्यास सहायक आहेत. यामध्ये असलेले मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असून, त्यामुळे नर्व्हस सिस्टमही चांगली राहते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील ही सर्व तत्वे सहायक आहेत. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट खूप काळ भरलेले राहते. त्यामुळे भूक लागणे कमी होऊन, वारंवार काही ना काही खात राहण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी वजन घटण्यास मदत होते.