छोट्या भावाच्या दूरसंचार मालमत्तांची मोठ्या भावाकडून खरेदी


मुंबई – अखेर थोरला भाऊ मुकेश अंबानी यांनीच गळ्यापर्यंत आलेल्या प्रचंड कर्जाच्या फासातून अनिल अंबानी यांना तारले असून मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानी यांच्याकडील दूरसंचार मनोरे तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय खरेदी केला आहे. मात्र अद्याप हा व्यवहार किती रकमेत झाला हे अस्पष्ट आहे.

रिलायन्स जिओने अनिल अंबानी यांच्याकडील रिलायन्स कम्युनिकेशन्स अंतर्गत असलेले ४३,००० दूरसंचार मनोरे, ४जी सेवा तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय खरेदी करण्याबाबतचा करार मुंबईत झाला. अनिल अंबानी यांनी या माध्यमातून या क्षेत्रातील त्यांच्याकडील अखेरच्या व्यवसायातूनही अंग काढून घेतले आहे.

मार्च २०१७ अखेर १,२८५ कोटी रुपयांचे नुकसान रिलायन्स कम्युनिकेशन्सने सोसले आहे. येत्या तिमाहीत रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडबरोबरचा नवा व्यवहार पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा व्यवहार गोल्डमॅन सॅच, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स, जेएम फायनान्शिअल, डेव्हिस पोल्क अँड वार्डवेल, सिरिल अमरचंद मंगलदास, खैतान अँड कंपनी व अर्न्‍स्ट अँड यंग यांच्या मध्यस्थीने होत आहे.

Leave a Comment