या सात गावातील तरूणांना मिळत नाही बायको


देशभरात सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे व देशाच्या बहुतेक गावा शहरातून सनई चौघड्याचे सूर ऐकू येत आहेत. मात्र राजस्थानातील सात गावे याला अपवाद ठरली असून गेल्या १२ वर्षात या गावात सनई चौघडा वाजलेलाच नाही. त्यामुळे लग्नाळू मुलांची मोठी पंचाईत झाली आहे तसेच १२ वर्षांपूर्वीच जे लग्नाच्या वयाचे होते ते आता घोडनवरे बनले आहेत मात्र अजूनही त्यांना हळद लागू शकलेली नाही. यासाठी कारण बनले आहे ते ताकली धरण.

ऐकून खरे वाटणार नाही मात्र ही सत्यकथा आहे. राजस्थानच्या सोहनपुरा, सारनखेडी, रघुनाथपुरा, तलियाबरडी, दडिया, दुडकली, तेमोलिया या गावात २०० हून अधिक उपवर मुले बिनलग्नाची आहेत.त्यांच्यासाठी मुलींचा शोध घेतला जातोय पण मुली येथे येण्यास तयार नाहीत. कारण या गावांचे पुनर्वसन झालेले नाही. २००७ साली येथे धरण बांधायला मंजुरी मिळाली. त्यामुळे ३१ गावातील ७३३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार होती. मात्र धरणाच्या पाण्याखाली जाणार्‍या या गावांना नुकसान भरपाईही मिळाली नाही व त्यांचे स्थलांतरही झालेले नाही. त्यामुळे या गावात नवी घरे बांधली जात नाहीत तशीच जुन्यांची दुरूस्तीही केली जात नाही. मध्यल्यामध्ये या तरूणांची लग्ने मात्र अटकून राहिली आहेत.

Leave a Comment