मगर हा प्राणी त्याच्या हिंस्रपणाबद्दल प्रसिद्ध आहे. परंतु केरळमधील एका मंदिरात चक्क शाकाहारी मगर असून ही ‘देवाची स्वतःची मगर’ असल्याचे येथील पुजारी सांगतात.
शाकाहारी मगर पाहायचीय?मग येथे जा!
बाबीया असे या मगरीचे नाव असून ती कासारगोड जिल्ह्यातील अनंतपुरा या गावात आहे. येथील मंदिराच्या कुंडात ही मगर सुखेनैव नांदत असून हे मंदिर तिरुवनंतपुरमच्या पद्मनाभस्वामी मंदिराचे मूळस्थान मानले जाते. ही मगर ही पद्मनाभस्वामीची दूत असल्याची येथील पुजारी व कर्मचाऱ्यांची श्रद्धा आहे.
दररोज संध्याकाळी ही शाकाहारी मगर पाहण्यासाठी भक्त व पर्यटकांची गर्दी उसळते. इतकेच नव्हे तर याच कुंडात मंदिरातील पुजारी स्नानही करतात. बाबिया या मंदिरात 70 वर्षांपेक्षा जास्त काळ राहत असून ती केवळ मंदिराचा प्रसाद म्हणजे भात खाऊन जगते. हा प्रसाद तिला दिवसातून दोनदा देण्यात येतो. चंद्रप्रकाश नावाचा कर्मचारी सकाळी व दुपारी भाताचे गोळे या मगरीच्या तोंडात ठेवतो. गेली 10 वर्षे तो हे काम करत आहे.
“मी बाबियाला दररोज 1 किलो भात खाऊ घालतो. तिला आम्ही मांस देत नाही आणि ती कुंडातील माशांवरही हल्ला करत नाही,” असे चंद्रप्रकाशने सांगितले.