या गावात आहे पुरूषबंदी


वर्तमानपत्रे, सोशल मिडीयावर सातत्याने येत असलेल्या बातम्यात महिलांवरील अत्याचार, लैगिक शोषण, बलात्कार, मारहाणीच्या बातम्या खूपच संख्येने दिसतात. अशावेळी पृथ्वीवर एकतरी ठिकाण असे असावे, जेथे महिला सुखाने, समाधानाने व कोणत्याही अत्याचारांशिवाय राहू शकतील असे वाटणे साहजिकच आहे. पुरूष अजिबात नसलेले गांव सापडणे कठीण असले तरी केनियातील उमोजा या गावाने मात्र पुरूष बंदी केली असून ती कटाक्षाने पाळली जाते. या गावात फक्त महिला व मुले राहतात व पुरूषांना येथे वास्तव्यासाठी प्रवेशच दिला जात नाही.

या गावात सध्या ५० महिला व २०० मुले वास्तव्यास आहेत. हे गांव सर्व दृष्टींनी स्वयंपूर्ण आहे. १९९० साली १५ महिलांनी एकत्र येऊन येथे वस्ती केली त्यातील सर्व जणी कधी ना कधी पुरूषांची शिकार झालेल्या होत्या. त्यात बलात्कार, मारहाण, लैगिक शोषणाचे बळी ठरलेल्या , घरगुती हिंसाचाराची शिकार बनलेल्या स्त्रिया होत्या. रिबेका लोलोसोकी या महिलने त्यांचे नेतृत्त्व केले व या गावात पुरूषांना बंदी करून टाकली. रिबेका ब्रिटीश सैनिकांच्या बलात्काराची शिकार झालेली होती व त्यातून निसटून बाहेर पडलेली आहे.


हे गाव आजही बालविवाहाची शिकार झालेल्या, बलात्काराला बळी पडलेल्या, मारहाण, लैगिंक शोषणाला बळी पडलेल्या महिलांचे स्वागत करून त्यांना संरक्षित व सुखी जीवन देते आहे. येथे त्यांना जनावरासारखी वागणूक मिळत नाही. उदरनिर्वाहाचा मार्ग त्यांनी शोधला आहे. जवळपासच्या सफारी वर येणार्यगया पर्यटकांना येथे प्रवेश फी घेऊन प्रवेश दिला जातो. गावातील महिला त्यांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, दागिन्यांची विक्री पर्यटकांना करून त्यातून कमाई करतात. अर्थात या महिलांचे हे स्वातंत्र पुरूषांनी सहजी मान्य केलेले नाही. आजही त्यांच्यावर अनेकदा हल्ले होतात, दबाव येतात मात्र अजून तरी त्यांनी कुणाही पुरूषाला गावात प्रवेश करू दिलेला नाही.

Leave a Comment