महिलांनी कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये


महिलांमध्ये सतत काही ना काही शारीरिक बदल होत असतात. जसजसे महिलांचे वय वाढत जाते, तसतसे हे बदल जास्त जाणवू लागतात. वरकरणी जरी हे बदल सामान्य वाटत असले, तरी हे बदल जाणवू लागले तर त्याकडे दुर्लक्ष न करता, त्यासंदर्भात तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण शरीरामध्ये होणारे हे काही बदल कर्करोगाचे लक्षण असू शकतात. आपल्या शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवत असेल, तर त्यासंबंधी धोक्याची सूचना आपले शरीर आपल्याला देत असते. निरनिराळ्या लक्षणांच्या रूपाने ही धोक्याची सूचना आपले शरीर आपल्याला देत असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

कित्येकदा स्त्रियांच्या स्तनांच्या आकारामध्ये बदल होतो, किंवा त्यामध्ये गाठ जाणवते. गाठ आहे, याचा अर्थ कर्करोग असेलच असे नाही. पण तरी देखील या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच स्तनामधून जर कोणत्याही प्रकारचा स्राव होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनावर लाली उद्भविल्यास किंवा सूज जाणाविल्यासही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.

महिलांमध्ये पोट फुगण्याची तक्रार सर्वसाधारण आहे. पण ही पोटदुखी जर कमी न होता काही दिवस तशीच राहिली, आणि त्याच्या जोडीने हलका रक्तस्राव होऊ लागला, तर ही धोक्याची सूचना असू शकते, अश्या वेळी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हे लक्षण कोलोन कॅन्सर, ओव्हरीज चा कॅन्सर, गॅस्ट्रोइंटेस्टीनल कॅन्सर किंवा पॅनक्रियाच्या कॅन्सरचे असू शकते. तसेच मासिक धर्माचे दिवस सोडल्यास एरवी रक्तस्राव होत असल्यासही तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

शरीरावर असलेला तीळ किंवा मस अचानक वाढू लागला, किंवा शरीरावर अचानक नवे डाग उत्पन्न होऊ लागले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच लघवीतून किंवा शौचातून रक्तस्राव होऊ लागल्यासही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बहुतांशी बाबतीत हा रक्तस्राव हॅमरॉइड्स मुळे असू शकतो, पण क्वचित प्रसंगी हे कोलोन कॅन्सरचे लक्षण असू शकते. विशेषतः हा रक्तस्राव जर दोन दिवसांपेक्षा जास्त राहिला तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

लिम्फ नोड्स मध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले, तर त्यांमध्ये बदल दिसून येतो. ही इन्फेक्शन बहुतेक वेळा बरी होतात, पण लिम्फ नोड्सवर सूज हे ल्युकेमिया किंवा लिम्फोमाचे लक्षण असू शकते. अश्या प्रकारची सूज जाणवू लागली आणि दोन आठवड्यांनंतर देखील ही सूज कमी होत नसली, तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावयास हवा. कधी घसा खराब असल्याने किंवा घश्याला सूज आल्याने गिळण्यास त्रास जाणवतो. पण जर हा त्रास वारंवार उद्भवू लागला, आणि त्याच्या जोडीने वजन झपाट्याने कमी होऊन सतत उलट्यांचा त्रास ही होऊ लागला, तर हे घशाच्या किंवा पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे घसा सुजणे किंवा गिळताना त्रास होणे ही लक्षणे सतत जाणवू लागली, तर त्याची तपासणी आवश्यक आहे.

आपले वजन कोणतीही मेहनत न घेता, खाण्या पिण्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण न ठेवता आपोआप कमी व्हावे अशी इच्छा प्रत्येक महिलेला होत असते. पण खाण्यापिण्यावर कोणतेही नियंत्रण नसताना, कोणताही व्यायाम करीत नसताना जर वजन झपाट्याने कमी होऊ लागले, तर ते कोलोन किंवा पॅनक्रिया च्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. बहुतेक वेळा प्रमाणाबाहेर शारीरिक किंवा मानसिक ताण देखील वजन झपाट्याने कमी होण्यास कारणीभूत ठरत असतो. तरी ही याची योग्य वेळी तपासणी करू घेणे चांगले.

ज्या महिला धूम्रपान करीत असतील, त्यांच्या तोंडाच्या आतमध्ये पांढरे, पिवळे किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसू लागल्यास हे तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. तसेच सतत तोंड येणे, किंवा तोंडामध्ये अल्सर होणे हे ही कर्करोगाचे लक्ष असू शकते. अंगामध्ये सतत ताप असल्यासही तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. ताप जरी आला, तरी तीन दिवसांनी इन्फेक्शन कमी होऊन ताप उतरतो. पण आलेला ताप तर त्याही पेक्षा जास्त दिवस राहिला, तर तपासणी करून घेणे गरजेचे आहे. अंगामध्ये सतत असणारा ताप ल्युकेमियाचे लक्षण असू शकते. तसेच धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये महिन्याभरापेक्षा जास्त काळ चालू राहणारा खोकला देखील धोक्याची सूचना देत असतो. या खोकल्याबरोबर जर धाप लागत असेल, तर हे लक्षण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे असू शकते.