नववर्षाच्या स्वागतासाठी निवडा ही देशाबाहेरील पर्यटनस्थळे…


नववर्षाची चाहूल आता लागत आहे. आपल्यापैकी बरेच जण नववर्षाचे स्वागत आपल्या मित्रपरिवारासमवेत किंवा नातेवाईक मंडळींसोबत करण्यास उत्सुक असाल. पण नेहमीप्रमाणे भारतामधील प्रसिद्ध पर्यटनस्थळी न जाता देशाबाहेरील एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याची आपली इच्छा असेल, तर काही पर्यटनस्थळांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. ही ठिकाणे अशी आहेत, जी निसर्गाच्या सौंदर्याने नटलेली आहेत, इथे पोहोचण्यासाठी फार जास्त काळ प्रवास करावा लागणार नाही, आणि मुख्य म्हणजे खिशाला परवडण्याजोगी आहेत.

इंडोनेशिया मधील गिली आयलंड गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरत आले आहे. येथे पोहोचण्यासाठी बाली पर्यंतचा विमानप्रवास करून, त्यानंतर बाली हून सुमारे दीड तासाचा बोटीचा प्रवास करावा लागतो. येथे चार दिवस राहण्याचा खर्च सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपये इतका येत असून, यामध्ये राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. तसेच सी-हॉर्स रायडींग समवेत अनेक थरारक खेळांचा अनुभव तुम्ही येथे घेऊ शकता.

थायलंड मधील कोह समुई हा समुद्रीकिनारा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सुंदर सागरी किनारा आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेले अनेक पब येथील आकर्षण आहेत. थायलंड मधील अन्य पर्यटन स्थळांच्या मानाने येथील वास्तव्य कमी खर्चाचे असून, भारतामधून आठ तासांच्या विमान प्रवासानंतर येथे पोहोचता येते. अनेक तऱ्हेच्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद येथे पर्यटकांना घेता येतो.

फिलिपिन्स मधील बोराके हे ठिकाण पॅराग्लायडिंग करिता प्रसिद्ध आहे. इथे अगदी सकाळी उजाडल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत पॅराग्लायडिंग करता येऊ शकते. पॅराग्लायडिंग करीत असताना सूर्यास्ताचा आनंद घेता येणारे हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. या शिवाय इतर अनेक तऱ्हेचे स्पोर्ट्स पर्यटकांना आकर्षित करतात. इथे तीन ते चार दिवस वास्तव्य करण्यासाठी सुमारे ऐंशी ते नव्वद हज्जार रुपये खर्च येतो.

Leave a Comment