एकीकडे अमेरिकेतील खासगी कंपन्या सामान्य लोकांना अंतराळात पाठविण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे, रशियानेही तेवढीच धमाकेदार योजना आखली आहे. रोसकॉसमस या रशियन अंतराळ संस्थेने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एक लक्झरी हॉटेल बनविण्याची योजना आखली आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर लक्झरी हॉटेल बनविणार रशिया
जी व्यक्ती 4 कोटी डॉलर म्हणजे 4 कोटी डॉलर म्हणजेच256 कोटी रुपये खर्च करण्यास तयार असेल, त्या व्यक्तीला या हॉटेलमध्ये एक किंवा दोन आठवडे मुक्काम करता येईल. तसेच आणखी 2 कोटी डॉलर दिले, तर अंतराळवीरांसोबत स्पेसवॉक करण्याचीही संधी त्यांना मिळेल. आरकेके एनर्जिया नावाच्या रशियन अंतराळ कंत्राटदाराला या हॉटेलच्या बांधकामाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे ‘पॉप्युलर मेकॅनिक्स’ या नियतकालिकाने म्हटले आहे.
हे हॉटेल बांधण्यासाठी सुमारे 27.9 कोटी डॉलर (1786 कोटी रुपये) ते 44.6 कोटी डॉलर (2855 कोटी रुपये) एवढा खर्च येण्याचा अंदाज आहे. या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी 4 खोल्या असतील आणि प्रत्येक खोलीत 9 इंचाची खिडकी असेल.
प्रत्येक वर्षी सुमारे 6 प्रवासी एका आठवड्यासाठी या हॉटेलमध्ये राहिले, तर कंपनीचा खर्च सात वर्षांमध्ये वसूल होईल. तसेच, हे हॉटेल बांधण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील, असे कंपनीचे म्हणणे आहे.