अश्लील इमोजी हटविण्यासाठी व्हाट्सअॅपला नोटीस!


व्हाट्सअॅपवर असलेली अश्लील इमोजी काढून देण्यासाठी दिल्लीतील एका वकिलाने कंपनीला नोटिस पाठवली आहे. येत्या 15 दिवसांत ही ‘मिडल फिंगर’ इमोजी काढून टाका, असे या नोटिसीत बजावण्यात आले आहे.

गुरमीत सिंह असे या वकिलाचे नाव असून ते दिल्ली न्यायालयात वकिली करतात. ‘मधले बोट (मिडल फिंगर) दाखवणारी इमोजी केवळ बेकायदाच नव्हे, तर अश्लील इशाराही आहे आणि भारतात हा एक गुन्हा आहे,’ असे त्यांनी फर्स्ट पोस्ट संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.

‘मिडल फिंगर दाखवणे केवळ अश्लीलच नाही तर अत्यंत आक्रमक चिन्ह आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 509 नुसार अश्लील, अभद्र, महिलांना आक्रमक इशारा दाखवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे व्हाट्सअॅपमध्ये अशा प्रकारच्या मिडल फिंगर इमोजीचा वापर करणे, हे महिलांसंदर्भात गुन्ह्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे,’ असे नोटिसीत म्हटले आहे.

यासाठी गुरमीत सिंह यांनी व्हाट्सअॅपमधून ही इमोजी काढून टाकण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. तसे केले नाही तर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Comment