शेर-ओ-शायरीच्या बादशाहाला गुगलची डूडलच्या माध्यमातून मानवंदना


मुंबई – गुगलने डूडलच्या माध्यमातून शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्झा गालिब यांना त्यांच्या २२० व्या जयंती निमित्ताने मानवंदना दिली आहे. मिर्झा असल-उल्लाह बेग खां असे मिर्झा गालिब यांचे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्र्यातील काळा महालमध्ये झाला. भारतात तेव्हा मुघलांचे राज्य होते. पारसी, उर्दू आणि अरबी भाषेत मिर्जा गालिब यांनी अभ्यास केला.

गुगलच्या डूडलमध्ये मिर्झा गालिब यांच्या हातात पेन आणि कागद दिसतो आहे. मुघलकालीन वास्तूकलेचे दर्शन त्यांच्या मागे साकारण्यात आलेली इमारत घडवत असून डूडलने मुघलकालीन भिंती, त्यावरील आकर्षक रचना, सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्झा गालिब यांचे पूर्ण चित्र साकारले आहे.

मिर्जा गालिब यांचे बालपण अत्यंत हालाखीच्या स्थितीत गेले. एका संघर्षाच्या उन्हातच त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवले. त्यांना आर्थिक संकटांनी तर बेजार केले. पण त्यांनी जगण्यातील चटकेही आपल्या शायरीतून व्यक्त केले. गालिब यांचे पितृछत्र लहान असतानाच हरपल्यानंतर त्यांना त्यांच्या काकांनी सांभाळले. पण फार काळ त्यांचा आधारही त्यांना मिळाला नाही. उमराव बेगम यांच्याशी वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि ते दिल्लीत आले. त्यानंतरच संपूर्ण आयुष्य दिल्लीतच गेले. मिर्झा गालिब मुघल काळातील शेवटचा सत्ताधारी बहादुर शाह जफर याच्या दरबारात कवी म्हणूनही राहिले.

Leave a Comment