आता फेसबुक अकाऊंट सुरु करण्यासाठी द्यावे लागणार आधारकार्ड?


फेसबुकवर नवीन अकाऊंट तुम्हाला सुरु करायचे असेल तर तुमच्याकडे आधारकार्ड असणे गरजेचे होणार असल्याचे चित्र सध्या दिसत असून प्रायोगिक तत्वावर नवीन फेसबुक अकाऊंटसाठी फेसबुकने आधारकार्डवरील नाव टाकण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. फेसबुकवर जास्तीत जास्त लोकांनी खऱ्या नावांनी अकाऊंट सुरु करण्याच्या दृष्टीने ही चाचपणी करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. अगदीच कमी लोकांना अशाप्रकारचे नोटीफिकेशन प्रायोगिक तत्वावर असल्याने अकाऊंट सुरु करताना दिसले असले तरी अद्याप फेसबुककडून आधारकार्डवरील नावाची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे कळते.

अशाप्रकारचे प्रयोग सुरु असल्याचे फेसबुकनेही मान्य केले आहे. लोक ज्या नावाने खऱ्या आयुष्यात ओळखली जातात त्याच नावाने त्यांनी अकाऊण्ट ओपन करावे ते त्यांच्या नातेवाईकांशी आणि कुटुंबाशी ज्यामुळे सहजपणे कनेक्ट होऊ शकतात. सध्याच्या प्रयोगानुसार तुमच्या आधारकार्डवरील नाव अकाऊंट सुरु करताना टाकण्यास सांगण्यात येते. ज्यामुळे नवीन युझर्सला त्यांच्या ओळखीचे लोक फेसबुकवर लगेच आणि सहज शोधू शकतील. हे सक्तीचे करण्यात आलेले नसून आम्ही फक्त याबद्दलच्या चाचण्या घेत असल्याची माहिती फेसबुकच्या भारतातील प्रवक्त्याने दिली आहे.

Leave a Comment