जेवणानंतर पोट फुगते का? मग करा हे उपाय…


कित्येकदा जेवणानंतर पोट जड होणे किंवा पोट फुगणे, दुखू लागणे अश्या तक्रारी उद्भवतात. किंवा जेवणामध्ये गोड पदार्थ जास्त खाल्ले गेले तरी पोट फुगून दुखू लागते. जे पोट फुगले, तर शरीर जड वाटायला लागते, आणि मनुष्य अगदी अस्वस्थ होऊन जातो. पोटाची ही तक्रार अतिशय सतावणारी ठरते. या साठी काही साध्या उपायांचा अवलंब करता येईल. ह्या उपायांचा अवलंब केल्यास पोटफुगी सारखे विकार उद्भविणार नाहीत.

आपल्या आहारामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असलेले अन्नपदार्थ समाविष्ट करा. पोटॅशियम मुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त ‘फ्लुइड्स’ किंवा द्रव बाहेर पडून पोटफुगी कमी होते. म्हणून आपल्या आहारामध्ये केळी, रताळी, पालक, पिस्ते अश्या पदार्थांचा समावेश आवर्जून करायला हवा.

बहुतेक लोक वेळेच्या अभावी किंवा आळस येतो म्हणून, भूक लागत नाही म्हणून सकाळची न्याहारी करणे टाळतात. आणि मग दुपारपर्यंत भूक अनावर झाल्याने दुपारच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात अन्न सेवन करतात. रात्रीच्या जेवणातही पचण्यास जड पदार्थ सेवन केले जातात, आणि परिणामी ’ब्लोटींग’ होते, म्हणजेच पोट फुगू लागते. सकाळच्या वेळी नाश्ता न करणे हे पोट फुगण्याचे मुख्य कारण असते. त्यामुळे सकाळी फायबर युक्त पदार्थांचा आपल्या नाश्त्यामध्ये समावेश करावा. फायबर युक्त पदार्थांच्या सेवनाने पोट पुष्कळ वेळ भरलेले राहते, त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये आपोआपच अन्न सेवन मर्यादित राहते. एखाद्या मेजवानीला जाण्यापूर्वी देखील फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आपोआप भूक कमी लागेल आणि मेजवानीतील तेलकट, मसालेदार, पचण्यास जड पदार्थांवर ताव मारण्याचा मोह आवरता येणे शक्य होईल.

जेवण झाल्यानंतर अनेक जणांना सुस्ती येते, शैथिल्य येते. या सुस्तीपायी अनेक जण आपल्या दिनचर्येतून व्यायामाला अजिबात फाटा देऊन टाकतात. असे न करता आपल्या दिवसातील काही वेळ व्यायामाकरिता देणे आवश्यक आहे. व्यायाम करणे अशक्य असेल, तर जास्त शारीरिक हालचाली होतील अशी कामे निवडा. ऑफिसमध्ये किंवा खरेदीला पायी जावे, शक्यतो लिफ्टचा वापर न करता जिन्यांवरून चढत जावे, बागकाम करावे, घराची सफाई करावी. या हालचालींमुळे शरीराला आवश्यक तो व्यायाम मिळून अन्नपचन सुरळीत होते आणि पोट फुगणे कमी होते.

आपल्या आहारामध्ये फायबर युक्त पदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी पिणे देखील समाविष्ट करावे. तसेच आपल्या आहारातील मिठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. मिठाच्या अतिसेवनाने शरीरामध्ये फ्लुईड्स साठत राहतात. परिणामी पोट फुगू लागते. पाणी पिताना एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळावे. पाणी पिताना थोडे थोडे पाणी दिवसातून अनेकदा प्यावे. जर जास्त खाण्यामुळे गॅसेस किंवा अपचन झाले तरी पोट फुगु लागते. अश्या वेळी पुदिन्याची पाने घालून केलेला काढा किंवा चहा पोटफुगी कमी करण्यास मदत करतो. या चहामध्ये साखर घालू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही