तनामनाला ताजे करणारी डेहराडूनची सफर


आता सुटीचे दिवस आहेत त्यामुळे थोड्या काळासाठी का होईना कुठेतरी भटकंतीला जायचा विचार असेल तर उत्तराखंड राज्यातील डेहराडून व्हॅलीचा विचार अवश्य करा. सुंदर दर्‍या, खुले आकाश, रमणीय निसर्ग, झुळझुळणारे झरे, कोसळणारे धबधबे, प्राचीन मंदिरे, गुहा अशी सर्व ठिकाणे तुम्ही येथे पाहू शकता. दरवर्षी हजारो पर्यटक डेहराडूनला भेट देत असतात. शिवाय मसुरी, नैनिताल, हरिद्वार, औली, ऋषिकेश येथे जाण्याचे हे प्रवेशद्वार आहे.


डेहराडूनमध्ये लक्ष्मण सिद्ध मंदिर,टपकेश्वर महादेव, संताला देवी, तपोवन ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. तसेच सहस्त्रधारा, टायगर फॉल सारखे अनेक छोटे मोठे धबधबेही आहेत.


टपकेश्वर हे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर असून मूळ शिवलिंग एका गुहेत आहे. डेहराडूनपासून साधारण ६ किमीवर दाट अरण्यात असलेल्या या शिवमंदिरातील शिवलिंगावर चोवीस तास पाणी टपकत असते व त्यावरूनच त्याचे नांव पडले आहे. श्रावणात व शिवरात्रीला येथे भाविकांची खूप गर्दी असते. शिवाय पांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांनी येथे अधिक ज्ञान मिळविण्यासाठी तपस्या केली होती असेही सांगतात. येथे दरवर्षी शिव पार्वतीचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डेहराडूनला जाण्यासाठी नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ सर्वात चांगला आहे.

Leave a Comment