भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्सला टाकणार मागे !


नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदराच्याबाबतीत (जीडीपी) आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्स या दोन बड्या देशांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला असून यासंबंधीचा अहवाल ‘द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) प्रसिद्ध केला आहे.

या अहवालानुसार वीज आणि तंत्रज्ञान आगामी वर्षात कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था वर्चस्व गाजवतील. यामध्ये वरच्या स्थानावर भारतीय अर्थव्यवस्था असेल. या एकूणच परिस्थितीमुळे जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांच्या यादीत आगामी १५ वर्षात आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे धक्के भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे काहीसा मंदावला आहे. पण तरीही भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे सीईबीआरचे उपाध्यक्ष डग्लस मॅकविल्यम्स यांनी सांगितले.

Leave a Comment