चीनमध्ये सुरू झाला जगातील सर्वात लांब काचेचा पूल


जगातील काचेचा सर्वात लांब पूल चीनमध्ये सुरू झाला असून जनतेसाठी तो खुला करण्यात आला आहे. या पुलाची क्षमता 2000 जणांची आहे, पण एका वेळेस यावर केवळ 500 लोकांना जाण्याची परवानगी असेल.

पिंग्सन काउंटी या प्रांतातील हांगीगुई या निसर्गमनोहर भागात दोन शिळांदरम्यान हा पूल लटकत्या स्थितीत असून तो जमिनीपासून 218 मीटर वर आहे. हा पूल सुमारे अर्धा किलोमीटर म्हणजे 488 मीटर लांब आणि दोन मीटर रूंद आहे. त्यावर ड्रॅगनचे दोन पुतळे असून ते धूर सोडू शकतात, असे इंडिया.कॉम संकेतस्थळाने म्हटले आहे.

या पुलाचे डिझाईनच केवळ अद्भूत नसून तो पारदर्शक काचेच्या 1,077 तुकड्यांपासून बनविला आहे. हा प्रत्येक तुकडा चार सेंटीमीटर जाड आहे. पर्यटक याच्या मध्यावर पोचताच तो झुलायला लागतो, त्यामुळे साहसाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी तो आकर्षण ठरला आहे.

असाच एक पूल हुनान प्रांतातील झांगजियाजी येथील ग्रँड कॅनियन भागात उघडण्यात आला होता. तो 430 मीटर आणि 6 मीटर रूंद होता. मात्र पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असल्यामुळे तो तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

Leave a Comment