या देशांमध्ये २५ डिसेंबरला साजरा केला जात नाही ख्रिसमस… असे का बरे?


आपल्या डोक्यात लहानपणापासून ख्रिसमस म्हटले की २५ डिसेंबर असे गणित पक्के असते. हा सण जगभरात याच दिवशी साजरा केला जातो असा समज आहे. येशू ख्रिस्तांचा या दिवशी जन्म झाल्याची आख्यायिका आहे म्हणून हा सण ख्रिश्चन लोक साजरा करतात. पण या जगात असेही काही देश आहेत जे २५ डिसेंबर ऎवजी वेगळ्या तारखांना ख्रिसमस साजरा करतात. पण अशी प्रथा या देशांत का पडली असावी. त्यामागचे कारण काय जाणून घेणे उत्सुकतेचे आहे.

ख्रिसमस हा सण रशियाच्या काही भागांमध्ये आणि मध्य पूर्व भागांमध्ये काही देशांमध्ये २५ डिसेंबरला नाही, तर २५ डिसेंबरनंतर १३ दिवसांनंतर साजरा केला जातो. १५८२ मध्ये पोप ग्रेगोरी द्वारे तयार करण्यात आलेल्या कॅलेंडरचा वापर जगभरात जास्तीत जास्त भागांमध्ये होतो. त्यानुसार ख्रिसमस २५ डिसेंबरलाच साजरा केला जातो. पण आजही अनेक मध्य पूर्व देशांमध्ये ‘ज्यूलियन’ कॅलेंडरचा वापर होतो. २५ डिसेंबर हा दिवस ज्यूलियन कॅलेंडरमध्ये ७ जानेवारीला येत असल्यामुळे या देशांमध्ये ख्रिसमस ७ जानेवारीला साजरा केला जातो. बेलारूस, इजिप्त, इथियोपिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, सर्बिया आणि रशिया यांचा या देशांमध्ये समावेश आहे.

लहान मुलांना ख्रिसमसमध्ये सांताप्लॉज भेटवस्तू देतो असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात आपल्या मुलाला आई-वडिलच काहीतरी भेटवस्तू देत असतात. पण आपला सांताक्लॉज म्हणजे पुरुष असा समज आहे. पण इटलीमध्ये बेनाफा म्हणजे सांताक्लॉजचे फिमेल रूप असून लहान मुलांसाठी ही वयोवृद्ध महिला गिफ्ट घेऊन येते अशी पद्धत आहे. २५ डिसेंबर नाही, ज्यूलियन कॅलेंडरनुसार इटलीमध्ये ७ जानेवारी नाही तर ६ जानेवारीला ख्रिसमस साजरा होतो. ‘द फिस्ट ऑफ एपिफेनी’ नावाने या देशात हा उत्सव साजरा होतो. असे म्हणतात की, तीन लोक येशू यांच्या जन्मानंतर १२व्या दिवशी त्यांना आपला आशिर्वाद आणि भेटवस्तू देण्यासाठी आले होते. त्याचमुळे इटलीमध्ये अनेक वर्षांपासून ६ जानेवारीला येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा केला जातो.

Leave a Comment