सांताक्लॉजचे थडगे सापडल्याचा तुर्कस्तानमधील पुरातत्त्वज्ञांचा दावा


काही पुरातत्त्व तज्ज्ञांनी जगभरातील लहान मुलांचे भावविश्व मोहरून टाकणाऱ्या सांता क्लॉजचे थडगे तुर्कस्तानात सापडल्याचा दावा केला आहे. संपूर्ण जगाला अवाक करणारा हा दावा आहे.

दक्षिण-पश्चिम तुर्कस्तानातील अंताल्या प्रदेशातील डेमरेमध्ये असलेल्या सेंट निकोलस चर्चच्या तळघरात सुस्थितीत असलेले एक थडगे सापडले आहे. हे थडगे सेंट निकोलस यांचे आहे. सांताक्लॉज म्हणून हेच सेंट निकोलस ओळखले जातात. डेमरे मायरा या प्राचीन शहराच्या भूमीत वसलेले असून सेंट निकोलस या मायरामध्ये चौथ्या शतकात वास्तव्याला होते. इटलीतील बारी येथे सेंट निकोलस यांची काही हाडे असल्याचे इतके दिवस मानले जात होते.

मायरावर सेलीजक तुर्कांनी १०८७मध्ये हल्ला केल्यावर इटलीतील व्यापाऱ्यांनी ही हाडे सोबत नेली होती. सेंट निकोलस तत्कालिन ख्रिश्चन समुदायात लहान मुलांबद्दल असलेली आत्मियता आणि प्रेमाच्या भावनेमुळे लोकप्रिय होते. सेंट निकोलस यांचे डेमरे येथे वास्तव्य होते म्हणून या चर्चमध्ये अनेक भाविक प्रार्थनेला येत असतात. तसेच, तेथे गेल्या २० वर्षांपासून पुरातत्त्वीय संशोधन सुरू होते.

याबाबत माहिती देताना अंताल्यातील पुरातत्त्वीय वास्तूंच्या संरक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक जेमील कारबायरम म्हणाले की, आम्ही विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंट निकोलस चर्चचा अभ्यास केला आहे. आम्हाला हे थडगे त्यातच चर्चच्या खाली आढळले. त्यांनी तुर्कस्तानातील हुर्रियत वृत्तपत्राला चर्चच्या खालच्या भागातील वास्तू उत्तम स्थितीत असल्याचे सांगितले.

बऱ्यापैकी या वास्तूचे नुकसान झाल्याने आत प्रवेश करणे सध्या अवघड आहे. तेथे पडलेले दगड आणि अन्य अवशेष नीट अभ्यासल्यावर हटवण्यात येतील. असे त्यांनी म्हटले आहे. तसेच काही प्राचीन कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर इटलीतील बारी येथे नेण्यात आलेली हाडे ही दुसऱ्याच ख्रिस्ती धर्मगुरुची असल्याचे कारबायरम यांनी स्पष्ट केले.

चर्च परिसरातील अंतिम टप्प्यातील उत्खनन सीटी स्कॅन यंत्र, जिओ रडार आणि आठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. सध्या येथे जगाचे डोळे लागून राहिले आहेत. सेट निकोलस यांना मृत्यूनंतर येथेच ठेवण्यात आले होते. आम्ही आता संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहोत. जर याचे सकारात्मक निकाल समोर आले तर अंताल्याच्या पर्यटनाला खूप वेगळे वळण लागले, असे कारबायरम हुर्रियत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगतात.

गेल्या अनेक शतकांपासून सेंट निकोलस यांचा प्रेमळ स्वभाव हा कौतुकाचा विषय ठरल्यामुळेच नाताळ सणाला लहान मुलांना भेटवस्तू देणारा ‘बाबा’ ही त्यांची ओळख जगाला सुपरिचित झाली. काही डच नागरिक अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांचे नाव आपल्या भाषेत ‘सिंटर क्लास’ असे घेऊ लागले.

Leave a Comment